पुणे | पानशेत धरणातून विसर्ग; भिडे पूल पुन्हा पाण्याखाली

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पानशेत धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने धरणात मोठ्या प्रमाणात पाणी जमा होत आहे. त्यामुळे धरणातून सोमवारी पहाटेपासून 15 हजार 136 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. हे पाणी खडकवासला धरणात जमा होत आहे.
आधीच खडकवासला धरण 100 टक्के भरल्याने तेथून सोमवारी दुपारी 25 हजार क्युसेकने विसर्ग नदीमध्ये करण्यात आला. त्यामुळे डेक्कन परिसरातील बाबा भिडे पूल पुन्हा पाण्याखाली गेला आहे.
खडकवासला प्रकल्पात एकूण पाणीसाठा 86 टक्के म्हणजे 25.03 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. मागील 24 तासांत खडकवासला-9, पानशेत-50, वरसगाव- 52 तर टेमघर धरण क्षेत्रात 120 मिमी पाऊस पडला आहे. पानशेत धरण 92 टक्के भरले आहे. धरणातून सोमवारी मध्यरात्री 9 हजार 824 क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात झाली.
त्यानंतर विसर्ग वाढविण्यात आला. पहाटे चार वाजता पानशेत धरणातून 15 हजार 136 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. तर, त्याचवेळी खडकवासला धरणातून 18 हजार 491 क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला. त्यामध्ये वाढ करून सकाळी नऊ वाजता 22 हजार 880 क्युसेक त्यानंतर दुपारी 12 वाजता 25 हजार क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात झाली.
धरण – पाणीसाठा- टक्के
खडकवासला – 1.69 टीएमसी – 85.53
पानशेत – 9.77 टीएमसी – 91.76
वरसगाव – 10.55 टीएमसी – 82.27
टेमघर- 3.03 टीएमसी – 81.69



