Nagar | ज्ञानोबा-माऊलींच्या गजरात दिंडी सोहळा

भाळवणी, (प्रतिनिधी): – पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील महात्मा फुले विद्यालयाच्या प्रांगणात ज्ञानोबा-माऊलींच्या गजरात विलोभनीय दिंडी सोहळा साजरा करण्यात आला. नऊशेपेक्षा जास्त विद्यार्थी या सोहळ्यात सहभागी झाले होते. सोहळ्याची सुरुवात गावातून दिंडी काढून झाली.
विठ्ठल-रखूमाई, वारकऱ्यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी हाती टाळ घेत चंद्रभागेच्या तिरी, पाऊले चालती, विठ्ठलनामाची शाळा भरली… यासारखी गीते व भजने सादर केली. त्यानंतर वेगवेगळ्या अभंगांवर चिमुकल्या वारकऱ्यांनी ताल धरला होता. शाळेतील शिक्षकवृंदाने फेर धरून, फुगड्या खेळून आनंद व्यक्त केला.
या सोहळ्याचे सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे ‘रिंगण’ मिरवणूक. जास्तीत-जास्त विद्यार्थी भगवा झेंडा हाती घेऊन यात सामील झाले होते. विद्यार्थिनींनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन सहभागी झाल्या होत्या. पावसाच्या रिमझिम सरींतला हा सोहळा पाहण्यासाठी पालकवर्गही मोठ्या संख्येने उपस्थित झाला होता.





