दीनानाथ रुग्णालयाचा अहवाल साफ खोटा; भिसे कुटुंबाचा आक्षेप

पुणे – पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात भरती होण्यासाठी आलेल्या गर्भवती तनिषा भिसे यांच्या मृत्यूप्रकरणी संताप वाढत आहे. प्रसूतीसाठी आलेल्या तनिषा यांना रुग्णालयाने १० लाख रुपये आगाऊ मागितल्याचा आरोप आहे. कुटुंबीयांनी अडीच ते तीन लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली, तरीही प्रशासनाने दाखल करून उपचार सुरू केले नाहीत, असा दावा भिसे कुटुंबाने केला आहे. यामुळे तनिषा यांचा मृत्यू झाल्याने रुग्णालयावर पैशांच्या हव्यासाचा ठपका ठेवत नागरिक आंदोलन करत आहेत.
रुग्णालयाने तज्ञ समिती नेमून अहवाल सादर केला, परंतु भिसे कुटुंबाने तो खोटा ठरवला. “आम्ही तीन लाख रुपये देण्यास तयार होतो, पैसे घेऊन गेलो होतो, पण रुग्णालयाने ते स्वीकारले नाहीत. १० लाख भरल्याशिवाय उपचार न देण्याचा हट्ट धरला. आम्ही तिथे तीन-चार तास होतो, सीसीटीव्ही तपासा,” असे कुटुंबीय म्हणाले. त्यांनी रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे दोन मुलांची आई गमावल्याचे सांगितले.
भाजप आमदार अमित गोरखे यांनीही अहवालावर आक्षेप घेत उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्याची घोषणा केली. “डॉ. घैसास, डॉ. केळकर आणि माझे पीए सुहास भिसे यांचे कॉल रेकॉर्ड तपासले तर सत्य बाहेर येईल. रुग्णालयाने १० लाख मागितल्याचे मान्य केले, पण तनिषाला कर्करोग होता हे खोटे आहे,” असे गोरखे म्हणाले.
रुग्णालयाच्या अहवालात तनिषा २०२० पासून उपचार घेत होत्या, २०२२ मध्ये ५०% सवलतीत शस्त्रक्रिया झाली आणि २०२३ मध्ये मूल दत्तक घेण्याचा सल्ला दिल्याचे म्हटले आहे. २८ मार्च २०२५ रोजी त्या सामान्य अवस्थेत आल्या, पण जोखमीमुळे भरतीचा सल्ला देऊन १०-२० लाख खर्च सांगितल्याचे रुग्णालयाने नमूद केले. कुटुंबीयांनी पैसे जमा करण्यास वेळ लावला आणि न सांगता निघून गेल्याचा दावा आहे. मात्र, भिसे कुटुंब आणि आंदोलकांनी हा अहवाल दिशाभूल करणारा ठरवला आहे.
-
रुग्णाची पार्श्वभूमी: सौ. भिसे या २०२० पासून रुग्णालयात उपचार घेत होत्या. २०२२ मध्ये त्यांची ५०% चॅरिटी लाभासह शस्त्रक्रिया झाली होती. २०२३ मध्ये त्यांना सुखरूप गर्भारपण शक्य नसल्याचा सल्ला देऊन मूल दत्तक घेण्याची शिफारस करण्यात आली होती.
-
प्रसूतीपूर्व तपासणीचा अभाव: गर्भवती महिलेसाठी किमान तीन वेळा प्रसूतीपूर्व तपासणी (ANC) आवश्यक असते. मात्र, भिसे यांनी पहिल्या सहा महिन्यांत रुग्णालयात एकदाही तपासणी केली नव्हती.
-
धोकादायक गर्भारपण: १५ मार्च २०२५ रोजी इंदिरा IVF च्या अहवालासह त्या डॉ. घैसास यांना भेटल्या होत्या. त्यांना जुळ्या मुलांचे गर्भारपण धोकादायक असल्याची माहिती देण्यात आली होती. दर सात दिवसांनी तपासणीस येण्याचे सांगण्यात आले होते, परंतु २२ मार्च रोजी त्या आल्या नाहीत.
-
२८ मार्चची घटना: २८ मार्च रोजी सकाळी ११:३० वाजता भिसे बाह्यरुग्ण विभागात डॉ. घैसास यांना भेटल्या. त्यावेळी त्या सामान्य स्थितीत होत्या आणि तातडीच्या उपचाराची गरज नव्हती. मात्र, जोखमीच्या स्थितीमुळे निरीक्षणासाठी भरतीचा सल्ला देण्यात आला. त्यांना १० ते २० लाख रुपये खर्चाची शक्यता सांगितली गेली. नातेवाईकांनी “पैशाची व्यवस्था करतो” असे सांगितले.
-
रुग्णालयाची भूमिका: वैद्यकीय संचालक डॉ. केळकर यांनी नातेवाईकांना “जमतील तेवढे पैसे (२-२.५ लाख) भरा, मी भरतीचा आदेश देतो” असे सांगितले. परंतु, नातेवाईकांनी प्रशासनाला प्रत्यक्ष भेटले नाही आणि रुग्ण न सांगता निघून गेला.
-
ससूनचा सल्ला: पैशाची तजवीज न झाल्यास ससून रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र, रुग्ण स्वतःच्या गाडीने सूर्या हॉस्पिटल, वाकड येथे गेला. तिथे २९ मार्च रोजी सिझेरियन झाले आणि गुंतागुंतीमुळे त्यांचा मृत्यू झाला.
-
जुळ्या मुलांचे गर्भारपण धोकादायक होते, याची रुग्णाला कल्पना होती.
-
रुग्णाने वैद्यकीय सल्ल्याचे पालन केले नाही आणि नियमित तपासणीला आली नाही.
-
रुग्णालयाने आगाऊ रक्कम मागितल्याच्या रागातून ही तक्रार दिशाभूल करणारी आहे, असे समितीचे मत आहे.





