Tanisha Bhise death report | तनिषा भिसे मृत्यू प्रकरणातील तिसरा अहवाल राज्य शासनाला प्राप्त झाला आहे. याअगोदर राज्य शासनाला तनिषा यांच्या मृत्यू प्रकरणातील सार्वजनिक आरोग्य विभाग आणि धर्मादाय सह आयुक्त समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे. अखेर तिसरा अहवाल पुणे महापालिकेच्या माता मृत्यू समितीने राज्य शासनाला सूपूर्त केला आहे. या अहवालात मातेच्या मृत्यूचे नेमकं कारण कोणते याचे विश्लेषण करण्यात आले आहे. मेंदूला प्राणवायुचा पुरेसा पुरवठा न झाल्याने मेंदूच्या पेशींवर परिणाम होऊन मेंदूचे कार्य बिघडल्याने (हायपॉक्सिक एन्सेफॅलोपॅथी) मृत्यू झाल्याचा निष्कर्ष या समितीने नोंदवला आहे. या समितीने महिलेचे वय, वैद्यकीय पार्श्वभूमी, वैवाहिक पार्श्वभूमी अशा विविध मुद्द्यांचा आधारे मृत्यूचे नेमके कारण शोधले असल्याचे माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. तसेच तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणात आरोग्य विभागाने दिलेल्या अहवालात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आला होता. तर धर्मादाय सह आयुक्त्यांच्या अहवालात रुग्णालयाने ३५ कोटी ४८ लाखांच्या धर्मादाय निधीचा वापरच केला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. आता तिसऱ्या माता मृत्यू अन्वेषण समितीचा प्रलंबित अहवाल राज्य शासलाना देण्यात आला आहे. यामुळे आता राज्य शासन या प्रकरणी कोणती कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. हायपॉक्सिक एन्सेफॅलोपॅथीमुळे महिलेचा मृत्यू तनिषा भिसे यांच्या मेंदूला प्राणवायुचा पुरेसा पुरवठा न झाल्याने त्यांच्या मेंदूच्या पेशींवर परिणाम होऊन मेंदूचे कार्य बिघडल्याने त्यांचा हायपॉक्सिक एन्सेफॅलोपॅथी मृत्यू झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्याबरोबच ‘डिसेमिनेटेड इंट्राव्हॅस्क्युलर कोॲग्युलेशन’ (डीआयसी) या स्थितीमुळेही महिलेचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे.