Chief Minister Devendra Fadnavis | पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाच्या बेजाबबदार वृत्तीमुळे एका गर्भवती महिलेला आपला जीव गमावावी लागल्याची घटना पुण्यात घडली. या घटनेनंतर रुग्णालयाबाहेर विविध संघटनांनी आंदोलन करत रुग्णालयावर आणि संबंधित डॅाक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली. आंदोलनकांनी आक्रमक भूमिका घेत प्रशानाचा निषेध नोंदविला. या प्रकरणाची गंभीर दखल राज्य शासनाने देखील घेत पाच सदस्यांची समिती गठित केली. या घटनेनंतर देवेंद्र फडणवीस हे शनिवारी पुणे दौऱ्यावर आले होते. त्यांनी भिसे कुटुबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. या भेटीनंतर त्यांनी मुख्यमंत्र्याच्या कार्यालयाच्या अधिकृत एक्स अकाउंटवरुन व त्यांच्या अधिकृत अकाउंटवरुन या घटनेतील चिमुकल्या मुलींच्या उपचाराचा खर्च मुख्यमंत्री सहायता निधीतून करणार असल्याचे जाहीर केले आहे. भिसे कुटुंबीयांच्या भेटीनंतर फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याकरिता समिती गठित केली असून त्याचा अहवाला आल्यानंतर कारवाई केली जाणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच भविष्यात अशी प्रकरणे होऊ नयेत म्हणून काय काळजी घेतली पाहिजे, या दृष्टीने एसओपी तयार करणार, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. या भेटीदरम्यान आमदार अमित गोरखे देखील उपस्थित होते. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात काल झालेल्या प्रकाराची माहिती मी भिसे कुटुंबीयांकडून घेतली. या प्रकरणात संपूर्ण चौकशी होईलच आणि अहवालानुसार कारवाई सुद्धा करण्यात येईल. पण, आज त्या कुटुंबापुढे सर्वांत मोठा प्रश्न, त्या जन्माला आलेल्या दोन अपत्यांच्या आरोग्याचा आहे. मुदतपूर्व प्रसुतीमुळे ही दोन्ही अपत्य आज ‘एनआयसीयू’मध्ये आहेत आणि आणखी काही काळ त्यांना तेथे उपचार घ्यावे लागणार आहेत. त्याचा खर्च सुद्धा अधिक आहे. त्यामुळे त्या दोन्ही मुलींचा उपचारांचा खर्च हा मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचे निर्देश दिले असल्याचे फडणवीस यांनी एक्स अकाउंटवरुन म्हटले आहे. अहवाल आल्यानंतर कारवाई रुग्णालय प्रशासनावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र, जोपर्यंत अहवाल येत नाही, तोपर्यंत कोणत्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करता येईल, याची स्पष्टता येणार नाही. त्यामुळे अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.