पुणे : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणी भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांचे कान टोचले आहेत. कुठल्यातरी सोम्यागोम्या, अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊन करण्याचे काम नाही. डॉ. सुश्रुत घैसास यांच्या वडिलांच्या हॉस्पिटलचा या घटनेशी काही संबंध नसताना केलेले हे मोडतोडीचे व उर्मट कृत्य आहे, असे म्हणत थेट भाजप पदाधिकाऱ्यांना मेधा कुलकर्णी यांनी फैलावर घेतले आहे. तसेच पुण्याचे भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांना पत्र लिहून डॉक्टर घैसास यांच्या रुग्णालयात झालेल्या तोडफोडीबद्दल मेधा कुलकर्णी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत रविवारी (ता. ६) धीरज घाटे यांना मेधा कुलकर्णी यांनी पत्र पाठवले आहे. त्यानंतर आता धीरज घाटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘मला हे पत्र मेधा कुलकर्णी यांनी दिलं नाही, माध्यमांच्या मार्फत हे पत्र मला समजलं आहे’, असं धीरज घाटे म्हणाले आहेत. या सर्व घडामोडीवर आता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामुळे शहरातील भाजपमध्ये कोल्ड वॉर सुरू आहे का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. काय म्हणाल्या मेधा कुलकर्णी ? पुणे भाजप शहर अध्यक्ष धीरज घाटे यांना मेधा कुलकर्णी यांनी हे पत्र लिहिलं आहे. डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या वडिलांच्या हॉस्पिटलचा या घटनेशी काही संबंध नसताना केलेलं हे मोडतोडीचं व उर्मट कृत्य अनेकांच्या जिव्हारी लागले आहे. पक्षाची प्रतिमा, व्यक्तीची राजकीय प्रतिमा या सर्व गोष्टी बनवण्यासाठी वेळ लागतो. परंतु अशा काही गोष्टींमुळे प्रतिमा डागाळली जाते व त्याचा परिणाम सर्वांनाच भोगावा लागतो. शिवाय वडाचे तेल वांग्यावर काढल्यामुळे विनाकारण एखाद्या व्यक्तीचे व एखाद्या समूहाचे, किंवा विशिष्ट समाजाचेही कायमस्वरुपी नुकसान होऊ शकते असं मेधा कुलकर्णी म्हणाल्या. कुठल्यातरी सोम्या गोम्या, अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊन करण्याचं काम नाही, राजकीय व्यक्तींच्या कृतीला विचारांची जोड असावी, सवंग प्रसिद्धीच्या मागे लागून पुढे जाण्याचे मोह कार्यकर्त्यांनी टाळले पाहिजे. हे समजावून सांगण्याचं काम तुम्ही शहर अध्यक्ष म्हणून कराल अशी आशा करते, असं मेधा कुलकर्णी यांनी पत्रात म्हटलं आहे. तसंच नुकसान भरपाई व दिलगिरी व्यक्त केल्यास पक्षाची गरिमा वाढेल असंही त्या म्हणाल्या आहेत. काय म्हणाले धीरज घाटे? धीरज घाटे म्हणाले की, मला हे पत्र मेधा कुलकर्णींनी दिलं नाही माध्यमांच्या मार्फत हे पत्र मला समजलं आहे. त्यांनी हे पत्र थेट मला द्यायला हवं होतं. महिला मोर्चाच्या महिला कार्यकर्त्यांमुळे त्यांनी पत्र दिलं आहे. मात्र, एका महिलेला प्रसूती दरम्यान मृत्यू झाल्याने महिलांचा रोष हा साहजिक आहे. मेधा कुलकर्णी आणि मी काल स्थापना दिनाच्या कार्यक्रमात भेटलो होतो, त्यावेळी या पत्रासंदर्भात काहीही बोलणं झालं नाही. त्यांनी पक्षाच्या बैठकीत या गोष्टी बोलायला हव्या होत्या, पत्राच्या माध्यमातून सगळ्यांना द्यायला नको होतं, मीडियाच्या माध्यमातून हे पत्र मला मिळालं आहे, असंही धीरज घाटे यांनी यावेळी स्पष्ट केलं. चित्रा वाघ यांनीही तोडफोडीचं केलं होतं समर्थन चित्रा वाघ यांनी या घटनेचं समर्थन केलं होतं. “भले शाब्बास ऽऽऽऽमाझ्या रणरागिणींनो …ज्या डॉक्टरांमुळे दोन चिमुकल्या आईच्या मायेला पोरक्या झाल्या त्या डॉ. घैसासला भाजप महिला मोर्चाच्या रणरागिणींनी चांगलाच धडा शिकवला. बेरड आणि माणुसकीने मेलेल्या या भूतांना असा हिसका दाखवावाच लागतो. त्या लेकरांची आई तर परत येऊ शकत नाही पण त्या लेकरांना न्याय मिळायलाच हवा.” असं चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.