Dimbhe Dam Leakage: डिंभे धरणाच्या भिंतीतून पाण्याचे फवारे! वाढत्या झिरप्याने शेतकरी अन् नागरिकांची चिंता वाढली
Dimbhe Dam Leakage: अनेक तालुक्यांच्या सिंचनाचा मुख्य आधार असलेल्या डिंभे धरणाच्या भिंतीची वर्षानुवर्षे दुरुस्तीच नाही? शेतकऱ्यांचा आरोप.

Dimbhe Dam Leakage – पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागासह अहिल्यानगर,सोलापूर आणि बीड जिल्ह्यातील काही तालुक्यांसाठी वरदान ठरणाऱ्या हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरणाच्या भिंतीतून वाढत्या प्रमाणात पाण्याचा झिरपा होत असल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जलसंपदा विभागाने तातडीने तांत्रिक पाहणी करून झिरपा रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
सुमारे साडेतेरा टीएमसी क्षमतेच्या या धरणातून येडगाव धरणाकडे मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जाते. त्यानंतर हे पाणी जुन्नर तालुक्यांबरोबरच अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा, बीड जिल्यातील कडा,आष्टी आणि सोलापूर जिल्यातील करमाळा आदी भागांतील शेती सिंचनासाठी उपयोगी पडते. तसेच डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यातून आंबेगाव व शिरूर तालुक्यातील सुमारे ५० गावांना सिंचनाचा लाभ मिळतो.
घोड नदीवरील आंबेगाव व शिरूर तालुक्यातील २५ बंधाऱ्यांनाही वर्षभर पाणी उपलब्ध राहते. मात्र, धरणाच्या भिंतीत अनेक ठिकाणी झिरपा वाढल्याचे दिसून येत असून काही भागांत पाण्याचे फवारे उडताना दिसत आहेत. सातत्याने होणाऱ्या झिरप्यामुळे धरणाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. गेल्या काही वर्षांत धरणाच्या भिंतीची आवश्यक दुरुस्ती न झाल्याने ही समस्या गंभीर बनत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
सध्या धरण पूर्ण क्षमतेने भरले असून सांडव्यावरून घोड नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे धरणाची नियमित तपासणी करून आवश्यक दुरुस्ती तातडीने हाती घ्यावी.अशी मागणी विठ्ठलवाडी येथील शेतकरी प्रा. वसंतराव भालेराव यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.
“डिंभे धरणाच्या भिंतीतील झिरप्याची तांत्रिक तपासणी नियमित सुरू आहे. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार आवश्यक दुरुस्ती व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येतील. धरणाच्या सुरक्षिततेबाबत नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. विभाग परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे.” – गणेश नान्नोर, कार्यकारी अभियंता कुकडी प्रकल्प.






