Pune District : डिंभे धरण 82 टक्के भरले
Pune District : नदीकाठावरील शेतीपंप, जनावरे, वाहने तसेच इतर साहित्य तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मंचर : आंबेगाव तालुक्यातील हुतात्मा बाबू गेनू सागर (डिंभे) धरण परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत असून, शुक्रवारी (दि. 24) सायंकाळी 7 वाजेपर्यंत धरण 82 टक्के भरले आहे. धरणाची सुरक्षितता आणि पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी घोड नदीपात्रात वक्र दरवाजांद्वारे कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग सुरू केला जाऊ शकतो, असा इशारा जलसंपदा विभागाने दिला आहे.
सध्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून, पावसाची तीव्रता वाढल्यास नदीपात्रातील विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही कारणासाठी घोड नदीपात्रात उतरू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. नदीकाठावरील शेतीपंप, जनावरे, वाहने तसेच इतर साहित्य तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
डिंभे, गोहे, कानसे, महाळुंगे तर्फे घोडा, शिनोली, घोडेगाव तसेच घोड नदीकाठच्या सखल भागातील नागरिकांनी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संबंधित ग्रामपंचायती आणि महसूल प्रशासनाला दवंडी, ध्वनिक्षेपक आणि संदेशांच्या माध्यमातून नागरिकांना सतर्क करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करून सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले आहे.
डिंभे धरणातील पाण्याची आवक सातत्याने वाढत आहे. परिस्थितीनुसार कोणत्याही क्षणी घोड नदीपात्रात विसर्ग सुरू होऊ शकतो. नागरिकांनी नदीकाठापासून दूर राहून प्रशासनाच्या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करावे.
-दत्तात्रय कोकणे, वरिष्ठ अधिकारी, जलसंपदा विभाग, निघोटवाडी (मंचर)





