Girija Oak : गिरीजा ओकनं कापले लांबसडक सुंदर केस? ‘नॅशनल क्रश’चा मॉडर्न लूक चर्चेत !
गिरीजा ओकच्या नव्या लूकची खासियत म्हणजे केवळ हेअरस्टाइलमध्ये झालेला बदल नाही, तर संपूर्ण व्यक्तिमत्त्वालाच त्यातून एक वेगळा, मॉडर्न आणि कॉन्फिडंट टच मिळाला आहे.

Girija Oak : आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी आणि गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर ‘नॅशनल क्रश’ म्हणून चर्चेत आलेली मराठी अभिनेत्री गिरीजा ओक पुन्हा एकदा इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरली आहे. काही महिन्यांपूर्वी निळ्या साडीतील तिच्या साध्या-सोज्वळ लूकने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला होता.
तिच्या सौंदर्यावर चाहते इतके फिदा झाले की, नेटकऱ्यांनी तिला थेट ‘न्यू नॅशनल क्रश’चा किताब दिला. आता त्याच गिरीजाने चक्क आपल्या केसांवर कात्री चालवत धाडसी शॉर्ट हेअर लूक केला आहे. तिचा हा नवा अवतार पाहून चाहते अक्षरशः थक्क झाले आहेत.
गिरीजा ओकच्या नव्या लूकची खासियत म्हणजे केवळ हेअरस्टाइलमध्ये झालेला बदल नाही, तर संपूर्ण व्यक्तिमत्त्वालाच त्यातून एक वेगळा, मॉडर्न आणि कॉन्फिडंट टच मिळाला आहे. अमेरिकेत पार पडलेल्या NAFA Film Festivalमध्ये गिरीजाने रेड कार्पेटवर एंट्री घेतली, तेव्हा तिचा हा लूक सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.
लाल रंगाचा आकर्षक वनपीस, त्यावर केलेलं मिनिमल स्टायलिंग आणि सर्वात लक्षवेधी म्हणजे छोटे केस गिरीजाचा हा अवतार तिच्या नेहमीच्या लूकपेक्षा पूर्णपणे वेगळा होता. NAFA Film Festival 2026चा कार्यक्रम 7 ते 9 ऑगस्टदरम्यान कॅलिफोर्नियातील सॅन होजे येथे आयोजित करण्यात आला होता.
गिरीजा ओकला या नव्या हेअरस्टाइलमध्ये पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये लगेचच चर्चा सुरू झाली. अनेकांना सुरुवातीला वाटलं की, हा कदाचित रेड कार्पेटसाठी केलेला तात्पुरता लूक असावा. एखाद्या खास फोटोशूटसाठी किंवा आगामी प्रोजेक्टमधील भूमिकेसाठी तिने विग अथवा हेअर एक्स्टेंशनचा वापर केला असावा, अशीही शक्यता चाहत्यांनी व्यक्त केली.
पण गिरीजाने स्वतः सोशल मीडियावर शेअर केलेल्या नव्या व्हिडीओनंतर या चर्चांना आणखी उधाण आलं. कारण या व्हिडीओमध्येही तिचे शॉर्ट हेअर स्पष्टपणे दिसत आहेत. म्हणजेच हा केवळ एका कार्यक्रमापुरता केलेला लूक नसून गिरीजाने खरोखरच आपल्या लूकमध्ये मोठा बदल केल्याचं दिसत आहे.
‘भारत भाग्य विधाता’मुळेही चर्चेत !
गिरीजा ओक सध्या केवळ तिच्या मेकओव्हरमुळे नाही, तर तिच्या अभिनयामुळेही चर्चेत आहे. नुकतीच ती कंगना रणौत आणि स्मिता तांबे यांच्यासोबत ‘भारत भाग्य विधाता’ या चित्रपटात झळकली. मनोज तपाडिया लिखित-दिग्दर्शित हा चित्रपट 12 जून 2026 रोजी प्रदर्शित झाला.
हा चित्रपट 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या काळात कामा आणि अल्ब्लेस हॉस्पिटलमधील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या धैर्याने प्रेरित आहे. चित्रपटात कंगना रणौत प्रमुख भूमिकेत असून गिरीजा ओक आणि स्मिता तांबे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.







