Dhayari Murder Case : कौटुंबिक वादाचा भयानक शेवट! सुनेचा निर्घृण खून करून सासरा पसार; धायरीतील धक्कादायक घटना
Dhayari Murder Case : बाळाच्या रडण्यामुळे झाला खुनाचा उलगडा; नांदेड सिटी पोलिसांकडून फरार सासऱ्याचा शोध सुरू, परिसरात दहशतीचे वातावरण.
Updated On:

Dhayari Murder Case – धायरीतील रायकर मळा येथे कौटुंबिक वादातून सासऱ्याने सुनेचा खून केला. सासऱ्याने सुनेचे डोके भिंतीवर आपटून तसेच दगडाने वार केल्याने तिचा मृत्यू झाला. यानंतर घराला कुलूप लावून सासरा पसार झाला. स्वाती तेजस चौधरी ( ३१) असे मृत महिलेचे नाव असून सासरे भानुदास भास्कर चौधरी यांच्याविरुद्ध नांदेड सिटी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
स्वाती चौधरी यांचे पती तेजस चौधरी हे शिवाजीनगर न्यायालयात क्लर्कआहेत. शनिवारी सकाळी ते न्यायालयात गेल्याने घरी सहा महिन्यांच्या बाळासह स्वाती आणि सासरे घरी होते. स्वाती या बाथरुममध्ये गेल्या होत्या. वाद झाल्याने भानुदास चौधरी यांनी स्वाती यांचे डोके भिंतीवर आपटले.
कपडे धुण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दगडाने त्यांच्या डोक्यावर वार करून त्यांचा खून केला. दुपारी बाळ बराच वेळ रडत असल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी पोलिसांना कळवून दरवाजा उघडला असता हा प्रकार उघडकीस आला. यानंतर स्वाती यांचे पती तेजस चौधरी यांना घटनेची माहिती देण्यात आली.





