धवनच्या सातत्यामुळे गिलच्या स्थानाला धोका; विश्वकरंडक स्पर्धेसाठी संधी देणार का ?

मुंबई -आयपीएल स्पर्धेत पंजाब किंग्जचे नेतृत्व करत असलेला सलामावीर शिखर धवन अफलातून फलंदाजी करत आहे. त्याचा या स्पर्धेतील फॉर्म पाहता येत्या काळात भारतात होत असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत त्याचा भारतीय संघात समावेश होऊ शकतो असे संकेत मिळत असून त्यामुळे शुभमन गिलच्या स्थानाला धोका निर्माण झाला आहे.
यंदाच्या आयपीएल स्पर्धेत धवन पंजाबचे नेतृत्व करत आहे. त्यांच्या संघाने फारशी चमकदार कामगिरी केली नसली तरीही वैयक्तीक स्तरावर धवनची कामगिरी मात्र, सातत्यपूर्ण होत आहे.
त्याने आतापर्यंत झालेल्या सामन्यांत मिळून चेन्नई सुपर किंग्जच्या ऋतूराज गायकवाडपेक्षा जास्त धावा करत ऑरेंज कॅपही हस्तगत केली आहे. पंजाबने आतापर्यंत खेळलेल्या तीन लढतीत धवनने 40, नाबाद 86 व नाबाद 99 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर सध्या एकूण 255 धावा आहेत.
त्याने या कामगिरीसह निवड समितीलाही प्रभावीत केले असून येत्या ऑक्टोबर व नोव्हेंबर या कालावधीत भारतात होत असलेल्या एकदिवसीय सामन्यांचय विश्वकरंडक स्पर्धेत त्याला भारतीय संघात स्थान मिळेल असेही वर्तवले जात आहे.
या स्थितीत फारसा सातत्यपूर्ण कामगिरी करत नसलेल्या गिलला संघात स्थान मिळेल का असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे विश्वकरंडक स्पर्धेत कर्णधार रोहित शर्मा याच्यासह धवनच भारताच्या डावाची सुरुवात करताना दिसला तरीही आश्चर्य वाटणार नाही.
धवन जेव्हा संघात होता तेव्हा त्याची रोहितबरोबर चांगली जोडी जमलेली होती. या जोडीने जगातील जवळपास प्रत्येक संघाविरुद्ध धावा केल्या आहेत.
2013 साली तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंह धोनीने धवन व रोहित ही जोडी सलामीला पाठवणे सुरु केले होते. धवनने 34 कसोटी सामन्यात 2 हजार 315 धावा, 167 एकदिवसीय लढतींत 6 हजार 793 धावा तर, 68 टी-20 सामन्यात 1 हजार 759 धावा केल्या आहेत.





