BJP News : भाजपला मोठा धक्का! माजी खासदाराने फेसबुकवर टाकला राजीनामा; समर्थकांनीही सोडला पक्ष
BJP News : आंवला मतदारसंघाचे माजी खासदार धर्मेंद्र कश्यप यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा फेसबुकवर जाहीर केला. त्यांच्या समर्थनार्थ काही पदाधिकाऱ्यांनीही राजीनामे दिले.

BJP News : उत्तर प्रदेशातील आंवला मतदारसंघाचे माजी खासदार धर्मेंद्र कश्यप यांनी भाजपच्या प्राथमिक आणि सक्रिय सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा फेसबुकवर अपलोड केला. पक्षाच्या संघटनेत निवडणुकीच्या काळात पक्षविरोधी काम करणाऱ्यांना महत्त्वाची पदे दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच मागास आणि अतिमागास समाजाला अपेक्षित सन्मान आणि राजकीय प्रतिनिधित्व मिळत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
धर्मेंद्र कश्यप यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष, प्रदेश अध्यक्ष, क्षेत्रीय अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांना उद्देशून राजीनामा दिला आहे. पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत त्यांनी आपला राजीनामा स्वीकारण्याची विनंती नेतृत्वाला केली आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे बरेलीच्या राजकारणात चर्चेला सुरुवात झाली आहे.
६ ऑक्टोबरलाच दिले होते संकेत
धर्मेंद्र कश्यप यांनी ६ ऑक्टोबरला फेसबुकवर ‘टाटा, गुड-बाय’ अशी पोस्ट करून भाजप सोडण्याचे संकेत दिले होते. त्याच दिवशी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा प्रोफाइल फोटोही बदलला होता. त्यानंतर शुक्रवारी त्यांनी फेसबुकवर अनेक पोस्ट केल्या. एका पोस्टमध्ये त्यांनी पक्षातील समीकरणांवर भाष्य केले. तसेच कांशीराम यांना श्रद्धांजली वाहणारी पोस्टही केली. त्यानंतर सायंकाळी सुमारे ५ वाजता त्यांनी राजीनामा अपलोड केला केला.
समर्थकांनीही दिले राजीनामे
धर्मेंद्र कश्यप यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांनीही राजीनामे दिल्याचे सोशल मीडियावरील पोस्टमधून समोर आले आहे. त्यामुळे पक्ष संघटनेतील हालचाली वाढल्या आहेत.
दरम्यान, भाजपचे क्षेत्रीय अध्यक्ष पूरन लाल लोधी यांनी धर्मेंद्र कश्यप हे आपले चांगले मित्र असल्याचे सांगितले. काही काळानंतर त्यांची भेट झाली होती आणि त्याचा फोटो सोशल मीडियावर टाकण्यात आला. या भेटीचा राजकीय अर्थ काढू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.
धर्मेंद्र कश्यप यांच्या राजीनाम्यावर क्षेत्रीय अध्यक्ष किंवा आंवला जिल्हाध्यक्षांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. आता भाजप नेतृत्वाची भूमिका आणि धर्मेंद्र कश्यप यांचा पुढील राजकीय निर्णय याकडे लक्ष लागले आहे.






