Dhanore Warehouse Fire : धानोरेत भीषण आग! स्क्रॅप गोडाऊन जळून खाक, धुराच्या लोटांमुळे परिसरात घबराट
Dhanore Warehouse Fire : धानोरे (ता. खेड) येथील ‘गायत्री स्टील अँड मेटल’ गोडाऊनमध्ये मंगळवारी दुपारी सव्वाचारच्या सुमारास थरार; ज्वलनशील वस्तूंनी पेट घेतल्याने आग भडकली.

Dhanore Warehouse Fire – आळंदी पोलीस ठाणे हद्दीतील धानोरे (ता. खेड) येथील ‘गायत्री स्टील अँड मेटल’ या स्क्रॅप वर्गीकरण व साठवण गोडाऊनला मंगळवारी (दि. 2) दुपारी सुमारे 4.25 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. गोडाऊनमध्ये साठवून ठेवलेल्या प्लास्टिकसह अन्य ज्वलनशील वस्तूंनी पेट घेतल्याने काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी तातडीने आग विझविण्याचे काम हाती घेतले. आगीमुळे परिसरात धुराचे मोठे लोट पसरल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त तैनात करून परिसरातील वाहतूक व नागरिकांची सुरक्षितता याबाबत आवश्यक उपाययोजना केल्या.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मात्र गोडाऊनमधील मोठ्या प्रमाणावरील साहित्य जळून खाक झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून आग पूर्णपणे विझल्यानंतर पंचनामा करून पुढील तपास करण्यात येणार असल्याचे संबंधित अधिकार्यांनी सांगितले.





