धनगर समाज शेखरभाऊंच्या पाठीशी

सातारा – 2014 मध्ये शेखर गोरे यांनी रासपकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी धनगर समाजाने त्यांच्या मागे ताकद उभी केली होती. या निवडणुकीतही आम्ही त्यांच्या पाठीशी ताकद उभी केली आहे. “ठरलंय’वाल्यांनी समाजातील काहींची बोली लावल्यामुळे ते संपूर्ण समाजाचीच बोली लावल्यासारखे भासवत आहेत. समाजातील अशा अपप्रवृत्तींना वेळीच धडा शिकवण्याची गरज आहे, असे आवाहन म्हसवडचे नगराध्यक्ष तुषार वीरकर यांनी केले.
शिवसेनेचे उमेदवार शेखर गोरे यांच्या प्रचारार्थ म्हसवड, ता. माण येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. माण पंचायत समितीचे उपसभापती नितीन राजगे, मार्केट कमिटीचे माजी चेअरमन आनंदराव वीरकर, सरपंच वसंत सजगणे, शंकर तांबवे, संतोष काळे, उमेश मडके, सुहास गोरड, शरद गोरड व धनगर समाजातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
तुषार वीरकर म्हणाले, आघाडी शासनाने धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवले असताना, आज तेच आरक्षणाचे भांडवल करत आहेत. धनगर समाजाचे नेते म्हणून मिरवणारे लोक समाजाची फसवणूक करत असून स्वत:ची राजकीय पोळी भाजून घेत आहेत. “आमचं ठरलंय’वाल्यांशी मिसळून तेच पुन्हा समाजबांधवांची फसवणूक करत आहेत. संपूर्ण धनगर समाजाचा पाठिंबा द्यायला समाज तुमच्या बापाचा आहे का? समाजातील प्रत्येकाला आपले मत देण्याचा अधिकार आहे. त्या मतांवर कोणीही आपली जहागिरी दाखवू नये. सर्व जातीधर्माचे नेते म्हणून शेखर गोरे यांच्याकडे पाहिले जाते. सर्वांना बरोबर घेण्याची त्यांची वृत्ती वाखणण्याजोगी आहे. या निवडणुकीत धनगर व इतर समाजाचे लोक त्यांना विक्रमी मतांनी निवडून आणणार आहेत.





