SSC Result 2026 : बापाचं पार्थिव घरी अन् लेक परीक्षा केंद्रावर! धनश्रीने अंत्यविधी सोडून दिला पेपर; इतके मिळाले गुण
SSC Result 2026 : सोलापूरच्या धनश्री पवारने वडिलांच्या निधनाचे दुःख बाजूला ठेवून दहावीचा पेपर दिला होता.

SSC Result 2026 : आयुष्यातील सर्वात मोठं दुःख समोर असतानाही शिक्षणासाठी जिद्दीने उभं राहण्याचं उदाहरण सोलापूर जिल्ह्यातील धनश्री पवार हिने घालून दिलं आहे. वडिलांचं पार्थिव घरात असताना दहावीचा पेपर देण्यासाठी परीक्षा केंद्रावर गेलेल्या धनश्रीने आता निकालात यश मिळवत सर्वांचं मन जिंकलं आहे. मराठी विषयात तिने ६५ गुण मिळवले असून एकूण ५५ टक्के गुणांसह ती उत्तीर्ण झाली आहे. (SSC Result 2026)
२० फेब्रुवारी २०२६ हा दिवस धनश्रीच्या आयुष्यात दुःखाचा डोंगर घेऊन आला. शरदचंद्र पवार प्रशालेत दहावीत शिकणाऱ्या धनश्रीचे वडील भिकाजी पवार यांचे अचानक निधन झाले. घरात अंत्यविधीची तयारी सुरू होती. नातेवाईकांचा आक्रोश आणि शोकाकुल वातावरणात धनश्रीसमोर मोठा पेच निर्माण झाला होता. त्याच दिवशी तिचा मराठीचा पेपर होता. (SSC Result 2026)
मात्र, धनश्रीचं शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून शाळेचे मुख्याध्यापक तानाजी माने यांनी पुढाकार घेतला. त्यांनी कुटुंबीयांना समजावून सांगत अंत्यविधी काही वेळ पुढे ढकलण्याची विनंती केली. त्यानंतर स्वतः धनश्रीला परीक्षा केंद्रावर घेऊन गेले. (SSC Result 2026)
वडिलांच्या निधनाचं दुःख मनात ठेवूनही धनश्रीने अवघ्या दीड तासात मराठीचा पेपर पूर्ण केला आणि पुन्हा घरी परतून वडिलांच्या अंत्यविधीत सहभागी झाली. तिच्या या धैर्याने आणि शिक्षणावरील निष्ठेने अनेकांना भावूक केले आहे. (SSC Result 2026)
दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर धनश्रीला मराठी विषयात ६५ गुण मिळाल्याचं स्पष्ट झालं. तसेच ती ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण झाली. तिच्या या यशानंतर शाळेतील शिक्षकांनी तिच्या घरी जाऊन विशेष सत्कार केला. (SSC Result 2026)
मुख्याध्यापक तानाजी माने, शिक्षक राजाराम शितोळे, नितीन मिस्कीन, श्रीराम बरगंडे आणि इतर शिक्षकांनी धनश्रीच्या जिद्दीचं कौतुक केलं. कठीण प्रसंगात शिक्षकांनी दिलेला आधार आणि पाठबळ हेच तिच्यासाठी मोठं बळ ठरल्याचं कुटुंबीयांनी सांगितलं. (SSC Result 2026)
दरम्यान, वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढेही शिक्षण सुरू ठेवणार असल्याचं धनश्रीने सांगितलं. भविष्यात व्होकेशनल कोर्स (MLT) करून स्वतःच्या पायावर उभं राहायचं असल्याचंही तिने स्पष्ट केलं. यावेळी तिची आई सुप्रिया पवार, भाऊ विजय आणि बारावी उत्तीर्ण झालेली मोठी बहीण वैष्णवी उपस्थित होत्या. (SSC Result 2026)





