SSC Result 2026 – आंबेगाव तालुक्याचा यंदाचा दहावीचा निकाल 98.42 टक्के इतका लागला असून विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तालुक्यातील एकूण 55 शाळांमधून 2 हजार 800 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 2 हजार 756 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 33 शाळांनी शंभर टक्के निकालाची नोंद केली आहे. अशी माहिती मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनील वळसे पाटील आणि सचिव अनिल देसले यांनी दिली. दहावीचा निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. मंचर येथील एमकेसीएल अधिकृत प्रशिक्षण केंद्र असलेल्या ओम इलेक्ट्रो कॉम्प्युटर सिस्टम आणि साक्षी कॉम्प्युटर्स येथे विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकालाची मोफत प्रिंट उपलब्ध करून देण्यात आली. संस्थाचालक प्रदीप लोंढे आणि अरुणा लोंढे यांनी ही माहिती दिली. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी सकाळपासूनच केंद्रांवर गर्दी केली होती. महात्मा गांधी विद्यालय मंचरचा निकाल 98.32 टक्के, शिवाजी विद्यालय धामणीचा 97.43 टक्के, भीमाशंकर विद्यालय शिनोलीचा 96.15 टक्के, नरसिंह विद्यालय रांजणीचा 98.49 टक्के, श्री भैरवनाथ विद्यालय अवसरी खुर्दचा 98.78 टक्के, शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालय डिंभेचा 97.67 टक्के तर न्यू इंग्लिश मीडियम स्कूलचा 98.24 टक्के निकाल लागला आहे. यंदाच्या निकालात विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांच्या सहकार्याच्या जोरावर चांगले यश मिळवले असल्याचे शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी सांगितले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही गुणवत्तापूर्ण निकाल देत तालुक्याच्या शैक्षणिक प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे चित्र पाहायला मिळाले.