Dhananjay Munde : ‘बीडचे सामाजिक ऐक्य अन् सलोखा कायम रहावे’ – मंत्री धनंजय मुंडे

पाटोदा – श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड येथे वैराग्यमूर्ती संत श्रेष्ठ श्री वामन भाऊ यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आयोजित महापुजेस राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे हे प्रतिवर्षीप्रमाणे उपस्थित राहिले. यावेळी त्यांनी बीड जिल्ह्यातील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा कायम अबाधित राहावा अशी प्रार्थना श्री गहिनीनाथ महाराज व संत वामन भाऊ यांच्या चरणी केली.
श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड येथे बुधवारी संत वामन भाऊ यांचा 49 वा पुण्यतिथी सोहळा साजरा केला गेला. मागील साधारण 20 ते 25 वर्षांपासून पुण्यतिथीच्या दिवशीच्या महापूजेचा मान धनंजय मुंडे यांना आहे. दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे याही वर्षी धनंजय मुंडे हे पुण्यतिथीच्या आदल्या दिवशी रात्रीच गहिनीनाथ गड येथे दाखल झाले.
पहाटेच्या विशेष महापूजेनंतर धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधताना श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाची ऊर्जा मला गोरगरिबांची सेवा करण्याचे बळ देते असे सांगितले. संत वामन भाऊ यांच्या समाधीची महापूजा संपन्न झाल्यानंतर श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांनी वारकरी संप्रदायाची ओळख असलेला मानाचा फेटा धनंजय मुंडे यांना बांधला. त्यानंतर धनंजय मुंडे यांनीही गडाचे महंत म्हणून विठ्ठल महाराज शास्त्रींना तसाच फेटा स्वतःच्या हाताने बांधला.





