Dhamani Lift Irrigation: शेतकऱ्यांनी स्वखर्चाने उभारली ६ कोटींची योजना; आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
Dhamani Lift Irrigation: मुंबईत पार पडली उच्चस्तरीय बैठक: धामणी उपसा जलसिंचन योजनेला 'हायब्रिड वीज जोडणी' देण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश,

Dhamani Lift Irrigation – आंबेगाव तालुक्यातील धामणी, पहाडदरा व परिसरातील शेतकर्यांनी लोकसहभागातून उभारलेल्या उपसा जलसिंचन योजनेच्या वीज जोडणीच्या प्रश्नावर मुंबई येथे गुरुवारी (दि. 25) रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे आणि परिवहनमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. धामणी येथे झालेल्या तीन दिवसांच्या उपोषणानंतर दिलेल्या आश्वासनानुसार शेतकरी प्रतिनिधींनी मुंबईत भेट घेऊन योजनेतील अडचणी मांडल्या.
बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव लोकेश चंद्रा यांना संबंधित अधिकार्यांसह धामणी येथे प्रत्यक्ष भेट देण्याचे निर्देश दिले. तसेच आठ किलोमीटर अंतरावरील शेतीपर्यंत पाणी पूर्ण क्षमतेने पोहोचण्यासाठी आवश्यक तांत्रिक उपाययोजना तातडीने करण्यास सांगितले. सौरऊर्जेवर योजना पूर्ण क्षमतेने चालविणे शक्य नसल्यास विशेष बाब म्हणून हायब्रिड पद्धतीने वीज जोडणी देण्याबाबतही त्यांनी आदेश दिले.
या बैठकीस शिवसेना जिल्हाप्रमुख देविदास दरेकर, युवासेना कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुणभाऊ गिरे, शिवसेना युवानेते रमेशभाऊ येवले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अजित चव्हाण, शिवसेना तालुकाप्रमुख प्रविण थोरात पाटील, धामणीचे माजी सरपंच सागर जाधव, निरगुडसरचे सरपंच रविंद्र वळसे पाटील, उद्योजक श्रीकांत लोखंडे, अजित बोर्हाडे, उपसरपंच अक्षय विधाटे तसेच परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
978 एकर क्षेत्र सिंचनाखाली येणार
धामणी, पहाडदरा व परिसरातील 428 शेतकरी कुटुंबांनी कोणतीही शासकीय आर्थिक मदत न घेता 65 किलोमीटर पाइपलाइन उभारण्यासाठी तब्बल 6 कोटी 82 लाख 50 हजार रुपयांचा खर्च केला असून, या योजनेमुळे सुमारे 978 एकर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
“धामणी, पहाडदरा परिसरातील शेतकर्यांच्या न्याय्य मागणीची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे. वीज जोडणीचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी स्पष्ट निर्देश देण्यात आले असून ही योजना लवकरच कार्यान्वित होईल, असा विश्वास आहे.”
– रमेश येवले, युवा नेते शिवसेना





