Dewald Brevis : डेवॉल्ड ब्रेव्हिसने केला कहर! सलग चार षटकार मारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘हा’ पराक्रम करणारा जगातील पहिलाच खेळाडू

Dewald Brevis Create History Against Australia : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना केअर्न्सच्या मैदानावर खेळला जात आहे. ही मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 172 धावांचा टप्पा गाठला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा युवा फलंदाज डेवॉल्ड ब्रेव्हिसने आपल्या धडाकेबाज खेळीने सर्वांचे लक्ष वेधून घेत इतिहास रचला आहे.
डेवॉल्ड ब्रेविसने केवळ 26 चेंडूंमध्ये एक चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर 53 धावांची खणखणीत खेळी साकारली. यासह त्याने एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला. जो आजपर्यंत कोणत्याच देशाच्या खेळाडूला ऑस्ट्रेलियाविरुद्ध करता आला नव्हता.या मालिकेत डेवाल्ड ब्रेविसच्या बॅटमधून सातत्याने आग ओकली गेली.
सलग चार षटकार ठोकत रचला इतिहास –
THREE NO-LOOK SIXES IN A ROW FROM DEWALD BREVIS!@BKTtires | #PlayoftheDay | #AUSvSA pic.twitter.com/2w1BpmQR8T
— cricket.com.au (@cricketcomau) August 16, 2025
तिसऱ्या सामन्यात त्याने दहाव्या षटकात जो अॅरॉन हार्डी याने टाकलेल्या चेंडूंवर सलग चार षटकार ठोकत आपली अर्धशतकी खेळी पूर्ण केली. यासह ब्रेविस टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एका सामन्यात सलग चार चेंडूंवर चार षटकार ठोकणारा पहिला खेळाडू ठरला. या मालिकेत ब्रेविसने एकूण 14 षटकार ठोकले, ज्यामुळे त्याची आक्रमक फलंदाजी पुन्हा एकदा चर्चेत आली.
हेही वाचा – Sanju Samson : केकेआर-राजस्थान रॉयल्समध्ये मोठी डील? सॅमसनच्या बदल्यात ‘या’ दोन खेळाडूंचा दिला पर्याय
ऑस्ट्रेलियाविरुद्ध झळकावले सर्वात जलद अर्धशतक –
डेवाल्ड ब्रेविसने या सामन्यात केवळ 22 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. यासह त्याने ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वात जलद अर्धशतक ठोकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. यापूर्वी हा विक्रम इंग्लंडच्या माजी खेळाडू रवी बोपारा याच्या नावावर होता. बोपाराने 2014 मध्ये होबार्ट येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना 23 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले होते. ब्रेविसने हा विक्रम मोडत आपले नाव इतिहासात नोंदवले.
या सामन्याच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, कारण हा सामना मालिकेचा विजेता ठरविणार आहे. ब्रेविसच्या या धमाकेदार खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेची बाजू मजबूत झाली असून, ऑस्ट्रेलियासमोर 173 धावांचे आव्हान आहे.





