Devendra Fadnavis : ‘आमची शेती आणि घरे वाचवा’; रिंगरोड बाधित शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर मांडल्या व्यथा

प्रभात वृत्तसेवा
चांदखेड – पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) अंतर्गत प्रस्तावित ६५ मीटर रिंग रोड आणि टीपीएस नगररचना योजना रद्द करण्याची मागणी करत सांगवडे, दारुंबरे, साळुंबरे, गोडुंबरे, धामणे आणि नेरे या गावांतील शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले.या निवेदनाद्वारे शेतकऱ्यांनी रिंग रोड आणि टीपीएस योजना राबवल्यास आमच्या शेतीवर, घरांवर आणि उपजीविकेवर मोठे संकट ओढवेल असे स्पष्ट केले आहे.
या पार्श्वभूमीवर ही योजना तातडीने रद्द करून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाचे नेतृत्व राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे किवळे येथे एका कार्यक्रमासाठी आले असताना शेतकऱ्यांनी त्यांना निवेदन दिले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या संदर्भात लवकरच बैठक घेऊन चर्चा करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती शेतकरी नेत्यांनी दिली.
या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चा अध्यक्ष गणेश वेगळे, भाजपा अध्यक्ष रवींद्र भेगडे, पुणे जिल्हा कामगार आघाडी अध्यक्ष किरण राक्षे, मावळ तालुका भाजपा किसान मोर्चा अध्यक्ष सूर्यकांत सोरटे, रोहन जगताप, यादव सोरटे, सरपंच गणेश सावंत आणि पंचक्रोशीतील सर्व शेतकरी उपस्थित होते.





