Devendra Fadanvis : “विकसित भारताच्या निर्मितीत महाराष्ट्राची भूमिका निर्णायक…”, स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री फडणविसांनी व्यक्त केली भूमिका
Devendra Fadanvis : महाराष्ट्राला कायम दुष्काळ मुक्त करण्याचा आपला प्रयत्न असेल - मुख्यमंत्री फडणवीस

Devendra Fadanvis : राजधानी दिल्लीसह देशाभरात आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला जात आहे. महाराष्ट्रातही विविध ठिकाणी ध्वजारोहणाचे कार्यक्रम पार पडले. मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. देवेंद्र फडणवीस यांनी देशाच्या स्वातंत्र्यदिनी राज्याला संबोधित केलं. तसेच महाराष्ट्राच्या प्रगतीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
महाराष्ट्र हे देशाचं ‘ग्रोथ इंजिन’ असून देशाच्या विकासातील अत्यंत महत्त्वाचं राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जात आहे. महाराष्ट्र देशाचं स्टार्टअप कॅपिटल झालं आहे. सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात आहे, सर्वाधिक परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आहे. त्यामुळे रोजगाराच्या सर्वाधिक संधी देखील महाराष्ट्रामध्ये निर्माण करून आमच्या युवाशक्तीला न्याय देण्याचा प्रयत्न आपण करत असल्याचे फडणविसांनी सांगितले.
विकसित भारताच्या निर्मितीत महाराष्ट्राची भूमिका निर्णायक
छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली शिकवण आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भारतीय संविधानाची मूल्ये यांना केंद्रस्थानी ठेवून महाराष्ट्र सातत्याने विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. आज देशातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जात असून, विकसित भारताच्या निर्मितीत महाराष्ट्राची भूमिका निर्णायक ठरणार आहे. आपण महिला शेतकरी हा कायदा तयार केला आणि पहिल्यांदा देशामध्ये महिलांना शेतकऱ्यांचा दर्जा हा देण्याचा निर्णय घेणार महाराष्ट्र पहिलं राज्य आहे याचा मला अतिशय आनंद असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं.
भारत माता की जय!🇮🇳
LIVE | भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण
🕘 स. ९.०१ वा. | १५-८-२०२६📍मंत्रालय, मुंबई.#Maharashtra #IndiaIndependenceDay #JaiHind https://t.co/10LgGHBuD9
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 15, 2026
प्रत्येक जिल्हा ग्रोथ इंजिन झाला पाहिजे
पुढे त्यांनी सांगितले की, यावर्षी पहिल्या सहामाहीत महाराष्ट्राचा जो आर्थिक विकासाचा दर आता मोजलेला आहे तो जवळपास 8.8 टक्के आहे. आपण प्रयत्न करतोय की प्रत्येक जिल्हा हा ग्रोथ इंजिन झाला पाहिजे. त्यामध्ये जवळपास 13 जिल्ह्यांनी आपलं टार्गेट पूर्ण केलं आहे. इतरही जिल्हे त्याच पद्धतीने विकासाकडे अग्रेसर आहेत.
विकास हा केवळ काही टप्प्यांमध्ये नाही, तर शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी मग गडचिरोली असो पालघर असो किंवा नंदुरबार असो अशा प्रत्येक भागामध्ये विकास पोहोचवण्याचा प्रयत्न आपण करत आहे,” असे त्यांनी सांगितले.
आज युवांकरता शिक्षणाच्या आणि रोजगाराच्या संधी निर्माण करत आहोत, तरूणाईला वर्ल्डक्लास शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी एज्युसिटीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात परदेशी विद्यापीठ येत आहेत, आपल्या विद्यापीठांचा दर्जा वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
36 हजार कोटी रुपयाची कर्जमाफीची योजना
फडणवीस म्हणाले की, आपल्या शासनाने शेतकऱ्यांकरता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना आणली. 56 लाख शेतकऱ्यांना 36 हजार कोटी रुपयाची कर्जमाफीची योजना आपण देतो आहोत. शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा आपण स्वप्न बघितलं होतं. 76 टक्के शेतकऱ्यांना आता आपण दिवसा वीज देतो आहोत आणि पुढच्या वर्षभरामध्ये 100 टक्के शेतकऱ्यांना दिवसाची वीज हा देण्याचा आपला संकल्प आपण पूर्ण करणार आहोत.
महाराष्ट्राला दुष्काळ मुक्त करण्याचा प्रयत्न
महाराष्ट्राच्या मागच्या पिढीने आणि या पिढीने मोठ्या प्रमाणात दुष्काळ पाहिला, पण महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही. मराठवाडा , विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातील काही तालुके असतील या ठिकाणी नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये पाणी आणून महाराष्ट्राला कायम दुष्काळ मुक्त करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
हेही वाचा :





