Bollywood news : आलिया भट्ट ते समांथा रुथ प्रभू… रोमँटिक भूमिका सोडून अॅक्शन मोडमध्ये आल्या या ‘5’ अभिनेत्री!
Bollywood news आता अभिनेत्री केवळ रोमँटिक भूमिका साकारताना दिसत नाहीत, तर अॅक्शन करताना आणि कठीण व्यक्तिरेखा साकारतानाही दिसत आहेत.

Bollywood news: चित्रपटसृष्टीत गेल्या काही वर्षांत अनेक मोठे बदल पाहायला मिळत आहेत. पूर्वी चित्रपटांमध्ये अभिनेत्रींच्या भूमिका प्रामुख्याने प्रेमकथा, भावना आणि कौटुंबिक कथांभोवती फिरताना दिसायच्या. मात्र आता प्रेक्षकांची पसंती बदलली आहे. त्यामुळे चित्रपटांच्या कथा आणि त्यातील व्यक्तिरेखाही अधिक दमदार होत आहेत. विशेष म्हणजे आता अभिनेत्री केवळ रोमँटिक भूमिका साकारताना दिसत नाहीत, तर अॅक्शन करताना आणि कठीण व्यक्तिरेखा साकारतानाही दिसत आहेत. अशाच काही अभिनेत्रींबद्दल जाणून घेऊया, ज्यांनी रोमँटिक भूमिकांपासून अॅक्शनच्या जगात आपली वेगळी ओळख निर्माण केली.
आलिया भट्ट
आलिया भट्टने आपल्या करिअरची सुरुवात रोमँटिक आणि हलक्याफुलक्या भूमिकांमधून केली. मात्र पुढे तिने वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका स्वीकारत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. ‘गली बॉय’, ‘गंगूबाई काठियावाडी’ आणि ‘राजी’ यांसारख्या चित्रपटांमधून तिने आपल्या अभिनयाची विविधता दाखवून दिली. त्यानंतर ‘जिगरा’ आणि ‘अल्फा’सारख्या चित्रपटांमध्ये तिचा अॅक्शन अवतार पाहायला मिळाला. त्यामुळे आलिया आता केवळ रोमँटिक अभिनेत्री म्हणून ओळखली जात नाही, तर दमदार अॅक्शन भूमिका करणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीतही तिचे नाव घेतले जाते.
वामिका गब्बी
वामिका गब्बीने कमी काळातच प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण केली. ‘जुबिली’ या सीरिजमधील तिच्या भूमिकेची चांगलीच चर्चा झाली. त्यानंतर ‘बेबी जॉन’मध्ये तिने आयपीएस तारा ही व्यक्तिरेखा साकारली. या भूमिकेत तिचा अॅक्शन अवतार पाहायला मिळाला. आता ‘डीसी’ या चित्रपटातून ती पुन्हा एकदा अॅक्शन करताना दिसत आहे. हातात बंदूक घेत दमदार भूमिका साकारणाऱ्या वामिकाचा हा बदल प्रेक्षकांना पसंत पडत आहे.
वामिका गब्बी
शर्वरी वाघ
शर्वरी वाघने आपल्या सुरुवातीच्या काळात ‘महाराज’, ‘मुंज्या’ यांसारख्या चित्रपटांमधून वेगवेगळ्या रोमँटिक आणि भावनिक भूमिका साकारल्या. या भूमिकांमुळे ती प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री बनली. मात्र ‘वेदा’ आणि ‘अल्फा’सारख्या चित्रपटांमध्ये तिचा अॅक्शन अवतार पाहायला मिळाला. अॅक्शनसोबतच अभिनयाची वेगळी बाजू दाखवत शर्वरीने स्वतःला एका ठराविक प्रकारच्या भूमिकेत मर्यादित ठेवले नाही. त्यामुळे भविष्यात ती बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक ठरू शकते, अशी चर्चा आहे.

शर्वरी वाघ
यामी गौतम
यामी गौतमने आपल्या करिअरच्या सुरुवातीला अनेक रोमँटिक भूमिका साकारल्या. मात्र कालांतराने तिने चित्रपट निवडीचा पॅटर्न बदलला आणि अधिक वेगळ्या भूमिका स्वीकारण्यास सुरुवात केली. ‘अ थर्सडे’ या चित्रपटातील तिच्या व्यक्तिरेखेचे मोठे कौतुक झाले. या भूमिकेत तिने अतिशय वेगळी आणि प्रभावी व्यक्तिरेखा साकारली. त्यानंतर ‘आर्टिकल 370’मध्ये यामी दमदार अॅक्शन करताना दिसली. या चित्रपटातून तिने आपल्या अभिनयासोबतच अॅक्शनची क्षमताही दाखवून दिली.

Yami Gautam
समांथा रुथ प्रभू
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री समांथा रुथ प्रभूने आपल्या कारकिर्दीत अनेक रोमँटिक भूमिका केल्या आहेत. मात्र पुढे तिने अॅक्शन भूमिकांकडेही आपला मोर्चा वळवला. ‘द फॅमिली मॅन 2’मधील तिच्या अॅक्शन भूमिकेची मोठी चर्चा झाली होती. त्यानंतरही तिने वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका स्वीकारल्या. अॅक्शन भूमिकांमुळे तिच्या अभिनयातील आणखी एक वेगळी बाजू प्रेक्षकांसमोर आली.
एकूणच, आजच्या काळात अभिनेत्रींसाठी भूमिका साकारण्याचे पर्याय मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे रोमँटिक भूमिकांपासून सुरुवात केलेल्या अनेक अभिनेत्री आता अॅक्शन, थ्रिलर आणि दमदार व्यक्तिरेखा साकारताना दिसत आहेत. प्रेक्षकांकडूनही या बदलाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आगामी काळात पडद्यावर महिला कलाकारांचे अॅक्शन अवतार आणखी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळण्याची शक्यता आहे.





