देवेंद्र फडणवीस प्रामाणिक आणि हुशार, भविष्यात केंद्रात मोठी संधी: उद्धव ठाकरेंची स्तुतीसुमने

मुंबई – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 55 व्या वाढदिवसानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. फडणवीस हे हुशार, प्रामाणिक आणि मुत्सद्दी राजकारणी असून, भविष्यात त्यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे, असे ठाकरे म्हणाले. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने प्रकाशित ‘महाराष्ट्राचा नायक’ या कॉफी टेबल बुकमध्ये ठाकरे यांच्यासह शरद पवार, नितीन गडकरी यांनी फडणवीसांच्या राजकीय प्रवासाचे कौतुक केले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्राच्या राजकारणात गंगाधरराव फडणवीस यांनी आदर्श राजकारणी म्हणून प्रतिमा निर्माण केली होती. हा वारसा देवेंद्र फडणवीस मेहनतीने आणि समर्थपणे चालवत आहेत. 2014 ते 2019 दरम्यान आम्ही त्यांच्यासोबत होतो. त्यांची विषय समजून घेण्याची जिद्द, प्रश्न सोडवण्याची तळमळ आणि राज्याला न्याय देण्याचा प्रयत्न जवळून पाहिला. विरोधी पक्षनेता म्हणूनही त्यांची धडपड दिसली. फडणवीस हे हुशार आणि प्रामाणिक राजकारणी आहेत. त्यांची प्रतिमा गतिमान, अभ्यासू आणि पक्षनिष्ठ नेत्याची आहे.”
फडणवीसांनी वयाच्या 22 व्या वर्षी नागपूर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून प्रवेश केला आणि 27 व्या वर्षी सर्वात तरुण महापौर बनले. कायद्याची पदवी, व्यवसाय व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी आणि बर्लिनमधील प्रकल्प व्यवस्थापनाचा डिप्लोमा यामुळे त्यांचे सखोल ज्ञान दिसते. ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ हे पुस्तक त्यांच्या जटिल विषय साध्या भाषेत मांडण्याच्या क्षमतेचे द्योतक आहे. ‘मेक इन महाराष्ट्र’ आणि ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ योजनांनी त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने प्रगती केली. ठाकरे यांनी फडणवीसांना राष्ट्रीय पातळीवर यश आणि केंद्रात मोठी संधी मिळण्यासाठी शुभेच्छा दिल्या.





