रोहित पवारांना मोठी जबाबदारी, शरद पवारांकडून नातवाला ‘पॉवर’

Rohit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने आमदार रोहित पवार यांना मोठी जबाबदारी सोपवत पक्षातील त्यांचे स्थान बळकट केले आहे. पक्षाने जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवून शशिकांत शिंदे यांची नवे अध्यक्ष म्हणून निवड केल्यानंतर अवघ्या २४ तासांत रोहित पवार यांची महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तसेच सर्व फ्रंटल आणि सेलच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली.
पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी ही घोषणा करत रोहित यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला.
नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तसेच सर्व फ्रंटल आणि सेलच्या प्रभारीपदी आमदार रोहित पवार यांची निवड करण्यात आली. रोहित यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची संघटनात्मक बांधणी आणखी मजबूत होईल याची खात्री आहे. स्व. यशवंतराव चव्हाण साहेब आणि… pic.twitter.com/RbNsYoAyoY
— Supriya Sule (@supriya_sule) July 16, 2025
सुप्रिया सुळे म्हणाल्या, यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांच्या विचारांना अनुसरून रोहित पवार काम करतात. नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या वैचारिक चौकटीला बळकटी देण्यासाठी रोहित कार्यरत राहतील.
रोहित यांच्याकडे सर्व फ्रंटल सेलच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आल्याने त्यांना आता सर्व सेलचा अहवाल सादर करावा लागेल. या नियुक्तीमुळे रोहित पवार पक्षात ‘आपली माणसं’ आणून प्रभाव वाढवतील, अशी चर्चा आहे. पक्षाने त्यांना ‘पॉवरफुल’ केल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.





