विशेष : लोकमान्य टिळक आणि काँग्रेस
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज (23 जुलै) 170 वी जयंती आहे. स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात काँग्रेस आणि लोकमान्य टिळक यांचे स्थान अनन्यसाधारण आहे. त्यानिमित्त...

– अमेय गुप्ते
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज (23 जुलै) 170 वी जयंती आहे. स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात काँग्रेस आणि लोकमान्य टिळक यांचे स्थान अनन्यसाधारण आहे. त्यानिमित्त…
भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास हा अनेक महान नेत्यांचा त्याग, संघर्ष आणि राष्ट्रनिष्ठेने उजळून निघाला असून, या इतिहासात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे नाव जणू सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्याला जनआंदोलनाचे स्वरूप देण्याचे, स्वराज्याची ठाम मागणी करण्याचे आणि सामान्य जनतेमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करण्याचे महान कार्य लोकमान्य टिळकांनी केले.त्यांच्या नेतृत्वामुळे काँग्रेसची वाटचाल केवळ राजकीय चर्चेपुरती मर्यादित न राहता ती लोकांच्या आशा-आकांक्षांचे प्रतिनिधित्व करणारी एक संघटना बनली.
राष्ट्रीय सभेची म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबईत झाली.त्याकाळात काँग्रेसचे नेतृत्व मवाळ नेत्यांकडे होते.पितामह दादाभाई नौरोजी, सर फिरोजशहा मेहता, नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्या सारखे नेते इंग्रज सरकारकडे अर्ज, विनंत्या आणि निवेदनांच्या माध्यमातून सुधारणा मिळविण्यावर भर देत होते.
1890 मध्ये टिळक काँग्रेसमध्ये सहभागी झाले त्यावेळी काँग्रेसचा भर ब्रिटिशांच्या न्यायबुद्धीवर आणि विनंत्यांवर होता. टिळकांनी या मवाळ धोरणावर कडाडून टीका करून काँग्रेस सामान्य जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे असा आग्रह धरला. टिळकांना असा विश्वास होता की, ब्रिटीश स्वेच्छेने भारतीयांना स्वातंत्र्य देणार नाहीत. त्यासाठी जनतेला संघटित करून संघर्ष करावा लागेल. त्यामुळे त्यांनी जहाल राष्ट्रवादी विचारांचा पुरस्कार केला आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये जणू नवचैतन्य निर्माण केले.
काँग्रेसला जनतेशी जोडण्यासाठी टिळकांनी सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचा प्रभावी वापर केला. त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव सुरू करून समाजातील सर्व स्तरांतील लोकांना एकत्र आणले. या उत्सवांमधून राष्ट्रीय विचारांचा प्रचार करण्यात आला. धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांमध्ये स्वदेशप्रेम, एकता आणि स्वाभिमानाची भावना वाढीस लागली. या उपक्रमांमुळे काँग्रेसचा प्रभाव शहरांपुरता मर्यादित न राहता ग्रामीण भागातही पोहोचला.
1907 मध्ये सुरत येथे भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात मवाळ आणि जहाल गटांमध्ये तीव्र मतभेद झाले. या मतभेदांमुळे त्यावेळी काँग्रेसमध्ये फूट पडली. यात टिळकांनी जहाल गटाचे नेतृत्व करून त्यांनी राष्ट्रहिताला सर्वोच्च स्थान दिले. त्यांच्या मते, स्वराज्य मिळवण्यासाठी संघटन, जनजागृती आणि संघर्ष हीच योग्य साधने होती. पुढे 1916 मध्ये टिळकांनी काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश करून, काँग्रेसच्या व्यासपीठावरून स्वराज्याची संकल्पना मांडली.
1905 ते 1907 आणि 1916 ते 1920 या काळात टिळकांची भूमिका ही संघटकाची होती. त्याकाळी काँग्रेस ही मध्यमवर्गीयांसाठी असून, टिळकांनी ती सर्वसामान्य जनतेपर्यंत नेण्याचे कार्य केले. सुरत येथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशानानंतर त्यांनी स्वराज्याच्या संकल्पाने संबंधी हिंदी जनतेत असलेल्या मतप्रवाहाचे तसेच स्वराज्यविषयक असलेल्या धारणेचा ऊहापोह राजकीय पक्षोप पक्ष या लेखमालेत केला.
काँग्रेसच्या अधिवेशनासाठी टिळक 25 ते 31 डिसेंबर 1916 याकाळात लखनौ येथे गेले होते. या अधिवेशनात आपल्या भाषणात त्यांनी होमरूल, स्वराज्य आणि सेल्फ गव्हर्मेंट या एकाच मागणीच्या तीन वेगळ्या नावांनी सर्वांनी एकत्र आले पाहिजे असे म्हटले. 30 डिसेंबर 1916 रोजी झालेल्या स्वराज्य संघाच्या सभेत डॉ. अॅनी बेझंट या सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. त्यांच्या विनंतीला मान देऊन टिळकांनी आपल्या भाषणात ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ अशी घोषणा दिली.
जोपर्यंत समाजातील प्रत्येक वर्गाला, व्यक्तींना आपण काँग्रेसमध्ये सहभागी करून घेत नाही तोपर्यंत स्वराज्य प्राप्ती होणार नाही असा विचार टिळकांनी आपल्या भाषणातून मांडला होता. त्यातच जाती-धर्मात भेद करण्याचा उपद्व्याप करण्याची ब्रिटीशांची नीती होती. 1909 मध्ये मोर्ले-मिंटो कराराद्वारे सरकारने मुस्लिमांना काँग्रेसपासून वेगळे केले होते. त्यामुळे लखनौ करारात सरकारला शह देऊन मुस्लिमांना काँग्रेसमध्ये सामील करून घेण्याचे मोठे काम टिळकांनी केले.
टिळकांची मंडालेतून सुटका झाल्यावर जहालांना काँग्रेसमध्ये प्रवेश मिळावा यासाठी पुन्हा प्रयत्न सुरू केले. नामदार गोखले यांची भेट घेऊन टिळकांनी आपला हा विचार त्यांच्यापुढे मांडला. त्यावर गोखले यांनी टिळकांना विरोध दर्शविला. त्यावर टिळक म्हणाले, मी काँग्रेसमध्ये येणार आणि ती मी काबीज करणार.
ज्या काँग्रेसने आपल्याला दूर केले त्या काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश का करायचा अशी टिळकांच्या सहकार्यांचीही भूमिका असून, आपण काँग्रेसच्या बाहेर राहून जर नवीन पक्ष स्थापन केला तर मवाळ (काँग्रेस), मुस्लीम लिग आणि त्यात जहाल पक्षाची भर पडणार होती, याचा फायदा घेऊन ब्रिटिश सरकार पुन्हा अंतर्गत दुही माजवणार हे टिळकांना माहीत होते.
19 फेब्रुवारी 1915 रोजी नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे आणि 5 नोव्हेंबर 1915 रोजी सर फिरोजशहा मेहता यांचे निधन झाले आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची सूत्रे लोकमान्य टिळकांच्या हातात आली.त्यामुळे काँग्रेसमधील टिळक युगाची सुरुवात खर्या अर्थाने झाली. टिळकांनी होमरूलचा ठराव मांडून सर्वांना काँग्रेसमध्ये सामील केले व भारतभर दौरा करून स्वराज्याचा झंझावाती प्रचारास त्यांनी सुरुवात केली.
टिळकांना काँग्रेसमध्ये असलेले जहाल व मावळ हे गट मान्य नसून, काँग्रेस ही एकसंध होऊन ती जहाल वैचारिक सरणीवर आधारित असावी असे वाटे. टिळकांनी आपल्या हयातीत काँग्रेसचे अध्यक्षपद कधीही भूषवले नाही. परंतु त्यांनी एक कार्यक्षम नेता म्हणून आपल्या देशाला, समाजाला व संघटनेला संघटित करून काँग्रेसला कार्यप्रवण बनवले. त्यांनी काँग्रेसचे मवाळ राजकारण जहाल करून काँग्रेसला खर्या अर्थाने लोकमान्यता मिळवून दिली.
आम्ही भांडू पण मोडणार नाही आणि तुम्ही मोडले तर आम्ही पुन्हा जोडू अशी टिळकांची भूमिका होती.असे मत न. चि. केळकर यांनी टिळकांविषयी बोलताना एकदा मांडले होते. यावरून भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात लोकमान्य टिळक आणि काँग्रेस यांचे नाते हे राष्ट्रनिर्मितीच्या महान पर्वाचे एक प्रतीक म्हणून सर्वांच्या सदैव स्मरणात राहील यात शंका नाही.






