Devendra Fadnavis | कुणबी दाखल्यांवर खाडाखोड नको; तक्रार करा, कारवाई करू – मुख्यमंत्री फडणवीस

प्रभात वृत्तसेवा
पुणे – मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासनाने हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीचा निर्णय घेतला आहे. कुणबी दाखले मिळण्यासाठी जे पात्र असतील त्यांना ते नक्की मिळतील. किती जणांना असे दाखले मिळाले, याची आकडेवारी माझ्याकडे नाही. दाखले मिळत नसल्याची कोणतीही तक्रार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.सेवा पंधरवडा अभियानाच्या प्रारंभानंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, कुणबी दाखल्यांसाठी आवश्यक कागदपत्रे आणि शासनाने स्थापन केलेल्या दोन समितीच्या अहवालावर दाखले देण्यात येतील. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी काही आक्षेप नोंदविले आहे.
कुणबी दाखल्यांवर कोणतीही खाडाखोड चालणार नाही, असे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. ज्यांच्याकडे योग्य कागदपत्रे असतील, त्यांनाच ती मिळतील. त्यासंदर्भात कोणाला आक्षेप असेल आणि खाडाखोड होत असल्याचे निदर्शनास येत असेल तर, त्यांनी तक्रार करावी, त्यावर योग्य ती कार्यवाही केली जाईल. अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याच्या कर्नाटक सरकारच्या निर्णयालाही फडणवीस यांनी विरोध दर्शविला. आवश्यकता भासली तर शासन सर्वोच्च न्यायालयात जाईल आणि कर्नाटकविरोधात याचिका दाखल करेल, असे त्यांनी नमूद केले.
राजकारण नको..
मुंबईतील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकल्याची घटना बुधवारी (दि.१७) उघडकीस आली आहे. या घटनेची पोलिसांनी वेळीच दखल घेतली असून तपास सुरु आहे. ज्या कोणी हा प्रकार केला आहे. त्याचा शोध घेऊन कडक कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांनाा दिल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणात कोणीही राजकारण करु नये. आरोपीला शोधून कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.




