अमरावती : आज अमरावतीमध्ये महायुतीची सभा पार पडली. या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी माजी खासदार नवनीत राणा यांचा आधुनिक झाशीची राणी म्हणून उल्लेख केला. त्यांच्या या विधानाची सध्या सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? “माझ्या आजोबांचं घरसुद्धा मेळघाटमध्ये होतं. नवनीत राणा येथील मुलगी आहे. तर मी देखील इथला मुलगा आहे. मेळघाटमध्ये नवनीत राणा यांना तुम्ही लीड दिला. मी तुम्हाला रामराम करतो. पण आपल्यासोबत बेईमानी झाली. जो राम को लाये हैं, उनको आपको लाना है. हमने हमारा काम किया हैं, अब आप की बारी हैं. नवनीत राणा यांनी मेळघाटसाठी ज्या मागण्या मागितल्या त्या पूर्ण करु. दुधाला जास्त भाव मिळावा यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. विरोधकांवर साधला निशाणा “महाविकास आघाडी सरकार आल्यावर इथल्या कामावर रोख लागली. स्काय वॉकचं काम थांबवण्याचे पाप महाविकास आघाडीच्या सरकारने केलं. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना 24 तास मोफत वीज मिळेल”, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी आपल्या भाषणात केली.