Devendra Fadnavis: युवकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्रिसूत्री; सारथीच्या मंचावरून मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
Devendra Fadnavis: छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेतर्फे (सारथी) स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा पुण्यात भव्य सत्कार.

Devendra Fadnavis – मराठा समाजातील आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागे राहिलेल्या घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासन खंबीरपणे पाठीशी उभे आहे. समाजातील ‘नाही रे’ वर्ग आणि मागास युवकांना वर आणण्यासाठी शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगार या त्रिसूत्रीवर आधारित धोरण राबविण्यात येत असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी)च्या वतीने गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित यूपीएससी,
एमपीएससी, तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. या वेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, महापौर मंजुषा नागपुरे, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह, मनपा आयुक्त नवलकिशोर राम, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, नियोजन विभागाच्या सचिव शैला ए., विभागीय आयुक्त शीतल तेली उगले, सारथीचे अध्यक्ष अजित निंबाळकर, व्यवस्थापकीय संचालक महेश पाटील उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, की मराठा समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी स्थापन झालेल्या सारथी संस्थेने उल्लेखनीय कार्य केले असून, आतापर्यंत युपीएससी, एमपीएससी आणि बँकिंग क्षेत्रात शेकडो तरुण यशस्वी झाले आहेत. १३ हजारांहून अधिक युवकांना रोजगारक्षम बनवण्यात आले आहे. युवकांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन तंत्रज्ञान आणि संगणक तंत्रज्ञानासारख्या आधुनिक कौशल्यांकडे वळावे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सारथी ही केवळ योजना नसून सामाजिक परिवर्तनाची चळवळ असल्याचे गौरवोद्गार काढले.
अजितदादांचे महत्त्वपूर्ण योगदान
सारथी संस्थेच्या बळकटीकरणासाठी दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे योगदान मोठे असून, विभागीय कार्यालये व वसतिगृहांच्या उभारणीसाठी १३६० कोटी रुपयांच्या प्रकल्पास मंजुरी देण्यात आली आहे, असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले. अजित पवार हे अर्थमंत्री असताना त्यांनी सारथीसाठी भरीव निधी दिला. त्यामुळे त्यांचे योगदान विसरता येणार नाही, असेही फडणवीस म्हणाले.





