जिल्ह्याचा विकास आराखडा करणार : मंत्री विखे

नगर – जिल्ह्याला तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळांचा मोठा ठेवा लाभलेला आहे. त्याबरोबर येत्या काही दिवसांत जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग मोठ्या संख्येने होत असल्याने राज्यासह अन्य राज्यांशी जोडणारे रस्ते होणार आहे. त्याचा फायदा घेवून पर्यटन व तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी तसेच जिल्ह्यात औघोगिकरण वाढविण्याचा प्रयत्न करून रोजगार निर्मितीला चालणार देण्यासाठी लवकरच जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करण्याचा निर्णय आज झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेण्यात आला असून त्यासाठी निधीची तरतूद केली असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. या बैठकीनंतर जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयात उभारण्यात आलेल्या पालकमंत्री संपर्क कार्यालयाचे उद्घाटन मंत्री विखे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अरूण मुंढे, नगर शहरजिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड आदी उपस्थित होते. मंत्री विखे म्हणाले की, जिल्ह्यात पर्यटन स्थळासह तीर्थक्षेत्र मोठ्या संख्येने आहे. त्यांचा विकासाच्या माध्यामातून रोजगार निर्मिती होऊ शकते. त्यात नगर जिल्ह्यातून अनेक राष्ट्रीय महामार्ग नव्याने झाले अन् पुढे होत आहे.
या जोडणाऱ्या रस्त्यामुळे नगर जिल्ह्यात मोठी वर्दळ वाढणार आहे. त्याचा जिल्ह्याला करून घेण्याचा प्रयत्न आहे. जिल्ह्यात औघोगिकरणाला मोठा वाव असल्याने लवकरच जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयाच्या प्राचार्यांची बैठक घेवून जे माजी विद्यार्थी जिल्ह्यातबाहेर आहे. व त्यांनी स्वतःचे उद्योग उभारले आहे. अशांची माहिती संकलित करून या भूमिपुत्रांनी जिल्ह्यात येण्याची निमंत्रण देणार आहे. त्यांनी जिल्ह्यातील तरूण पिढीला मार्गदर्शन करून उद्योग उभारून रोजगार निर्मिती करावी, असा प्रयत्न आहे. त्यासाठी जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांना सुचना देण्यात आल्या असून त्यासाठी राज्य सरकारची मदत घेण्यात येणार आहे. असे मंत्री विखे म्हणाले.
विजेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. विशेषतः रोहित्र जळणे, ते दुरुस्ती करण्यास विलंब होणे अशा तक्रारी वाढल्या आहे. त्यासाठी रोहित्र बॅंक उभारण्याचा निर्णय झाला असून ते रोहित्रांचा साठा केला जाणार आहे.जिल्ह्यात अनेक रस्ते खड्डमय झाले आहे. दिलेल्या मुदतीमध्ये देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदारांची असतांनाही त्यांनी ती केली नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे अशा ठेकेदारांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्याची माहिती मंत्री विखे यांनी दिली.
लंकेंचे आंदोलन नॉनइश्यू : विखे
इश्यू करीत आंदोलन झाले नाही तर ते नॉनइश्यूसाठी आंदोलन होते. पालकमंत्री या नात्याने आरोप त होणारच अर्थात राजकीय स्टंट म्हणून ते आंदोलन झाले आहे. स्वतः विरोधी पक्षनेत्यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याशी फोनवर बोलल्यानंतरच वस्तूस्थिती समोर आली. म्हणजे काय तर जे काम सुरू आहे. त्यासाठी केलेला हा राजकीय स्टंट असल्याची टीका मंत्री विखेनी आमदार नीलेश लंके यांच्यावर केली.
करोना प्रोटोकॉल लागू
जिल्ह्यात तातडीने करोना प्रोटोकॉल लागू करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच जिल्ह्यातील देवस्थानांच्या ठिकाणी मास्क सक्ती करण्यात आली असून आवश्यक त्या उपाययोजन करण्याचे सांगण्यात आले आहे.





