भाजपने बीएमसीसाठी दीडशे पारचा नारा देताच उपमुख्यमंत्री शिंदे दिल्ली दौऱ्यावर; चर्चांना उधाण

Eknath Shinde | आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. यादरम्यान आता महायुती एकत्र लढणार की स्वबळावर? याबाबत अद्याप स्पष्ट भूमिका घेण्यात आलेली नाही. दुसरीकडे, महायुतीमधील अंतर्गत धुसफूस समोर येत आहे. याच दरम्यान आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर गेल्याने चर्चेला उधाण आले आहे.
मुंबईत सत्ता काबीज करण्यासाठी भाजपकडून हालचालींना वेग आला आहे. दीडशेपेक्षा जास्त उमेदवार मैदानात उतरवण्याची तयारी भाजप करत आहे. तर शिवसेना शिंदे गटाला ६० ते ७५ जागा भाजप देणार असल्याचं म्हटलं जातंय. मात्र एकीकडे भाजपने बीएमसीसाठी दीडशे पारचा नारा दिला असतानाच अचानक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत.
दिल्लीवारीचं कारण अस्पष्ट
शुक्रवारी मध्यरात्री ते दिल्लीला रवाना झाले. यावेळी शिंदेंच्या दिल्लीवारीचं कारण मात्र समजू शकलेलं नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्यासाठी दिल्लीला गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. Eknath Shinde |
शिंदे यांनी यापूर्वी देखील अनेकदा अचानक दिल्ली दौरे केले आहेत. दिल्लीत जाऊन ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि जेपी नड्डा यांच्या भेटी घेतल्या होत्या. आता पुन्हा एकदा अचानक उपमुख्यमंत्री शिंदे दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
हेही वाचा:
“….तर घरात घुसून मारू”; काँग्रसेचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असं का म्हणाले?





