Ravindra Dhangekar : रविंद्र धंगेकरांची शिवसेनेतून हकालपट्टी होणार, एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार?

पुणे : महायुतीत अंतर्गत तणाव वाढत असताना शिवसेना नेते रविंद्र धंगेकर यांची पक्षातून हकालपट्टी होण्याची शक्यता बळावली आहे. विश्वसनीय सूत्रांनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबतची युती वाचविण्यासाठी धंगेकरांवर कारवाईचा मोठा निर्णय घेतला असून, लवकरच त्यांची हकालपट्टी होईल. ही कारवाई पुण्यातील भाजप नेत्यांच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदे यांच्या चर्चेतून घडली असल्याचे सांगितले जाते.
धंगेकर यांनी घायवळ टोळीचा गोळीबार प्रकरणापासून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावरील जैन बोर्डिंगच्या जागेशी संबंधित कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांपर्यंत भाजप नेत्यांना लक्ष्य केले आहे. महायुतीतूनच आरोप होत असल्याने भाजप नेते त्रस्त झाले असून, त्यांनी थेट फडणवीस यांच्याकडे तक्रार नोंदवली.
या पार्श्वभूमीवर फडणवीस-शिंदे यांची चर्चा झाली. यामध्ये धंगेकरांच्या वर्तनावर नाराजी व्यक्त करण्यात आली. सूत्रांनी सांगितले की, शिंदे यांनी युतीत ‘दंगा’ नको, असे धंगेकरांना पुण्यात जाहीरपणे सांगितले तरीही त्यांनी टीका थांबवली नाही, यामुळे हा निर्णय घेण्यात आला.
समज देऊनही धंगेकरांची गाडी सुसाट
शिंदे यांनी धंगेकरांना समज देऊनही त्यांची टीका सुरूच राहिल्याने महायुतीत बेबनाव निर्माण होण्याची भीती आहे. भाजपमधील सूत्रांनी सांगितले की, धंगेकर हे महाविकास आघाडीचा हस्तक असून, उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत त्यांना हँडल करत आहेत. “धंगेकरांचा धोका ध्यानात आल्यानंतर शिंदे यांचे मत बदलले आहे. युती वाचवण्यासाठी कारवाई अपरिहार्य आहे,” असे एका भाजप नेत्याने सांगितले. धंगेकर हे मूळतः शिवसेना कार्यकर्ते असले तरी, त्यांच्या वर्तनामुळे शिंदे गटात नाराजी आहे.





