Pimpri : भटक्या श्वानासाठी फीडिंग पॉइंट तयार करा

पिंपरी : शहराच्या विविध भागांमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे अशा मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांना महापालिकेकडून सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनानुसार शहरात फीडिंग पॉइंट उपलब्ध करावेत, अशी मागणी प्राणीप्रेमी प्रियंका डोळस यांनी केली आहे.
याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसंवाद सभेत ही मागणी करण्यात आली. यावेळी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनाही निवेदन देण्यात आले. पिंपरी-चिंचवड शहरासह उपनगर भागांमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भटक्या कुत्र्यामुळे परिसरात लहान मुले, महिला, मुली, वयोवृध्द नागरिक यांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे.
अनेक गल्ल्यांमध्ये, चौकांमध्ये, मुख्य रस्ते, भाजीपाला मार्केट, चिकन, मटणाची दुकाने याठिकाणी कुत्र्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे शहरातील भटक्या कुत्र्यांसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्राणी जन्म नियंत्रण नियम, २०२३ अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनानुसार फिडिंग पॉइंट उपलब्ध करणे बंधनकारक केले आहे.
शहरातील दापोडी, पिंपरी, चिंचवड, दिघी, सांगवी, भोसरी, चिखली, मोशी या ठिकाणी फीडिंग पॉइंट उपलब्ध करुन द्यावेत. त्याठिकाणी भटक्या कुत्र्यांना अन्न आणि पाणी मिळू शकेल. तो परिसर स्वच्छ व लोकसंख्येच्या अंतरावर असणे आवश्यक आहे. फीडिंग पॉइंटवर महापालिकेने स्वतंत्र फलक लावावेत.
कुत्र्याच्या संख्येनुसार फिडींग स्पॉट उपलब्ध करण्यात यावेत. हे फीडिंग पॉइंट करताना प्राणी प्रेमी व स्थानिक रहिवाशी यांच्याशी संवाद साधून करावेत. त्या फिडींग पॉइंटवर लसीकरण हे दर सहा महिन्यांनी राबविणे आवश्यक आहे. कुत्र्याचे लसीकरण, नसबंदी, जंतनाशक आणि नंतरच्या काळजीसाठी योग्य सुविधा असलेली नसबंदी केंद्रे स्थापन करावीत. शस्त्रक्रिया गृहांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य आहेत. उपचार, औषधांचा वापर आणि कुत्र्यांच्या संख्येचे रेकॉर्ड ३० दिवसांच्या फुटेजसह ठेवले पाहिजे अशी सूचनाडोळस यांनी केली आहे.





