DPL 2024 : षटकारांचा विश्वविक्रम होईल असे कधीच वाटले नव्हते – आयुष्य बडोनी

Ayush Badoni Century In Delhi Premier League 2024 – दक्षिण दिल्लीचा कर्णधार असलेल्या आयुष बडोनीने (Ayush Badoni) दिल्ली प्रीमियर लीगमध्ये 55 चेंडूत 165 धावांची दमदार खेळी केली. त्याने या खेळीत तब्बल 19 षटकार मारताना नवीन विक्रमावर आपले नाव कोरले. बडोनीच्या तुफानी फलंदाजीने दक्षिण दिल्ली संघाने उत्तर दिल्ली स्ट्रायकर्स संघाला 112 धावांनी विजय मिळविला होता. या लढतीमध्ये दक्षिण दिल्लीच्या आयुष बडोनीने सलामीवीर प्रियांश आर्य (102) Priyansh Arya यांच्यासह दुसऱ्या गड्यासाठी 286 धावांची भागीदारी करताना देखील विक्रमाची बरोबरी केली.
लखनौ सुपर जायंट्स संघाकडून खेळणाऱ्या आयुष बडोनीने दिल्ली प्रीमियर लीगच्या टी-20 लढतीमध्ये 19 षटकार मारले. यापूर्वी वेस्ट इंडिजचा आक्रमक सलामीवीर ख्रिस गेल व एस्टोनियाच्या साहिल चौहानने 18 षटकार मारण्याचा विक्रम केला होता. हा विक्रम आयुष्य बडोनीने मागे टाकला. मी फक्त चांगल्या चेंडूच्या शोधात होतो. माझ्या नावावर असा काही विक्रम जमा होईल, असे कधीच वाटले नव्हते. या खेळीत चेंडू जोरात मारण्याचा कधीच विचार केला नाही. केवळ टायमिंग कसे साधता येईल याकडे मी लक्ष्य केंद्रित केले होते, असे बडोनीने सांगितले.
AYUSH BADONI, THIS IS ICONIC…!!!! 🫡
– 165 runs from just 55 balls including 8 fours & 19 sixes in the Delhi T20 league.
The future of Delhi white ball cricket is in the safe hands of Badoni. pic.twitter.com/3pCnKNT38H
— Johns. (@CricCrazyJohns) August 31, 2024
आयपीएलमध्ये खेळताना लखनौ सुपर जायंट्सकडून बडोनीने अनेक महत्वपूर्ण खेळी केल्या आहेत. सध्या देशांतर्गत सुरु असलेल्या दिल्ली प्रीमियर लीग मध्ये आयुष्य दक्षिण दिल्ली सुपरस्टार या संघाचे नेतृत्व करत आहे. आजच्या खेळीने त्याला भविष्यात देखील मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. ‘आगामी होणाऱ्या मेगा लिलावाचा मी विचार केलेला नाही. सध्या कर्णधार म्हणून खेळताना दिल्ली प्रीमियर लीगचे विजेतेपद मिळण्यासाठी प्रयत्न करत आहे. आयपीएलमध्ये जागतिक गोलंदाजांचा सामना केल्यानंतर या स्पर्धेत खेळणे तुलनेने सोपे असल्याचे आयुष्य बोडोनीने बोलताना सांगितले.
आयुषच्या प्रतिभेने प्रभावित झालो : जॉन्टी रोहड्स
आयुषने मला हर्शेल गिब्जची आठवण करून दिली. आयुषकडे चेंडूवर जबरदस्त प्रहार करण्याची क्षमता आहे. मैदानाच्या मध्यभागी असताना कल्पकता ठेवून शांतपणे फलंदाजी करताना आपले लक्ष्य साध्य करणे हे गुण गोलंदाजासाठी घातक ठरतात. त्याच्या भात्यात पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही प्रकारचे फटके तो सहजपणे खेळतो. त्यामुळेच त्याचा खेळ पाहिल्यानंतर मला हर्शेल गिब्जची प्रकर्षाने आठवण आली, असे दक्षिण आफ्रिकेचा स्टार क्षेत्ररक्षक असलेल्या जॉन्टी रोहड्सने बोलताना सांगितले.





