PBKS vs LSG : 6,6,6,Wd,1,6,6…प्रियांश-कूपरने मार्क्रमच्या एकाच षटकात पाडला धावांचा पाऊस, पाहा VIDEO
PBKS vs LSG : या सामन्यात पंजाबने प्रियांश आर्य आणि आणि कूपर कोनोली या दौघांच्या भागीदारीच्या जोरावर लखनौसमोर २५५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

PBKS vs LSG Aiden Markram expensive over : न्यू चंदीगडमधील मुल्लांपुर स्टेडियमवर आयपीएल २०२६ च्या २९ व्या सामन्यात धावांचा पाऊस पाहायला मिळाला. पंजाब किंग्सच्या (PBKS) फलंदाजांनी लखनौ सुपर जायंट्सच्या (LSG) गोलंदाजांची अक्षरशः पिसं काढली. सलामीवीर प्रियांश आर्या आणि कूपर कोनोली यांच्या वादळी फलंदाजीमुळे एकाच षटकात ५ षटकार ठोकण्याचा पराक्रम आज मैदानावर घडला.
प्रियांश-कूपरने केली मार्क्ररमची धुलाई –
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या पंजाब किंग्सने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. सामन्यातील १३ वे षटक हे आयपीएल २०२६ मधील सर्वात रोमांचक षटक ठरले. लखनौचा फिरकीपटू एडन मार्क्रम हे षटक टाकण्यासाठी आला आणि पंजाबच्या फलंदाजांनी त्याला ‘लक्ष्य’ केले. कूपर कोनोलीने पहिल्या तीन चेंडूंवर सलग ३ षटकार ठोकून मार्क्रमला बॅकफूटवर ढकलले.
एका ओव्हरमध्ये कुटल्या ३२ धावा!
32 runs in an over off Aiden Markram🥶
pic.twitter.com/5zjuOkLu6m— p (@coolfyfied) April 19, 2026
दबावात असलेल्या मार्क्रमने एक वाईड चेंडू टाकला आणि चौथ्या चेंडूवर एक धाव आली. त्यानंतर स्ट्राईकवर आलेल्या प्रियांश आर्याने पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर सलग २ षटकार खेचले. अशाप्रकारे या एकाच षटकात एकूण ५ षटकारांसह ३२ धावा वसूल करण्यात आल्या. यासह एडन मार्क्रम आता लखनौ सुपर जायंट्ससाठी आयपीएल इतिहासातील सर्वात महागडे षटक टाकणारा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम रवी बिश्नोईच्या (२७ धावा) नावावर होता.
१८२ धावांची ऐतिहासिक भागीदारी –
प्रियांश आर्या (९३) आणि कूपर कोनोली (८७) हे दोघेही आपापल्या शतकापासून थोडक्यात मुकले असले तरी, त्यांनी दुसऱ्या विकेटसाठी १८२ धावांची अवाढव्य भागीदारी रचली. पंजाब किंग्सच्या आयपीएल इतिहासातील ही केवळ तिसरी १५० पेक्षा जास्त धावांची भागीदारी आहे. या जोडीने लखनौच्या गोलंदाजीचे वाभाडे काढत पंजाबला विशाल धावसंख्येच्या दिशेने नेले. पंजाबने या कामगिरीने स्पर्धेत पुन्हा एकदा आपला दरारा निर्माण केला आहे.





