Rahul Gandhi : दिल्लीत राजकीय तापमान वाढले.! बैठकीआधीच पोस्टर वॉर सुरु; राहुल गांधींवर राजकीय हल्लाबोल !
नवी दिल्लीत इंडिया आघाडीच्या महत्त्वपूर्ण बैठकीपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लक्ष्य करणारे वादग्रस्त पोस्टर्स काही भागांत लावण्यात आले होते.

Rahul Gandhi – नवी दिल्लीत इंडिया आघाडीच्या महत्त्वपूर्ण बैठकीपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लक्ष्य करणारे वादग्रस्त पोस्टर्स काही भागांत लावण्यात आले होते. राजधानीतील राजकीय वातावरण तापवण्याचा प्रयत्न करणारे हे पोस्टर्स दिल्ली युवक काँग्रेसने सोमवारी तत्परतेने काढून टाकले.
शहरातील प्रमुख चौक आणि सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेल्या या होर्डिंग्जवर विरोधकांमधील विविध पक्षांच्या नेत्यांची जुनी किंवा वादग्रस्त विधाने छापण्यात आली होती.
यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी, द्रमुकचे नेते उदयनिधि स्टॅलिन आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या विधानांचा समावेश होता. यातील बहुतांश विधाने काँग्रेस किंवा राहुल गांधी यांच्यावर टीका करणारी होती.
कॉन्स्टिट्युशन क्लबजवळ लावलेल्या एका होर्डिंगवर राहुल गांधी आणि शरद पवार यांचे फोटो होते, ज्यावर राहुल गांधी यांच्यात सातत्याचा अभाव असल्याचा दावा करण्यात आला होता.
तर दुसऱ्या एका होर्डिंगवर केरळचे माजी मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या विधानाचा हवाला देऊन, राहुल गांधी राष्ट्रीय नेते असले, तरी त्यांच्याकडे सामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये असते तशी राजकीय समज नाही, असा मजकूर लिहिण्यात आला होता.
युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अक्षय लाक्रा यांनी या मोहिमेचा तीव्र निषेध करत याला आघाडीमध्ये फूट पाडण्याचा आणि संभ्रम निर्माण करण्याचा राजकीय कट असल्याचे म्हटले आहे.
भाजप, आम आदमी पार्टी आणि इतर काही घटकांकडून अशा प्रकारची खालच्या पातळीची आणि स्वस्त राजकारण करण्याची खेळी खेळली जात आहे. राजकारण कधीही खपवून घेणार नाही.
जर कोणी इंडिया आघाडीत फूट पाडण्याचा किंवा अशा प्रकारे चिथावणी देण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही त्यांना त्यांच्याच भाषेत चोख प्रत्युत्तर देऊ, असा इशारा अक्षय लाक्रा यांनी दिला.





