Rahul Gandhi: “विद्यार्थ्यांना ठार मारण्याचा आदेश कोणी दिला?” ; राहुल गांधींचा गृहमंत्री अमित शाह यांना पत्राद्वारे थेट सवाल
Rahul Gandhi: दिल्लीत २० जुलै रोजी जंतर मंतर ते संसद मोर्चादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज आणि अश्रुधूर हल्ल्याबद्दल राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे.

Rahul Gandhi: दिल्लीतील जंतर मंतर येथून २० जुलै रोजी निघालेल्या संसद मोर्चादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज आणि अश्रुधूर हल्ल्याबद्दल राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे. त्यांनी रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना औपचारिकपणे पत्र लिहून अनेक प्रश्नांची उत्तरे मागितली आहेत.
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी, “२० जुलै रोजी दिल्लीत शांततेने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या क्रूर हल्ल्याबद्दल जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करण्यासाठी मी हे पत्र लिहित आहे.” असे त्यांनी म्हटले.
त्यांनी लिहिले की, “आमचे विद्यार्थी एका निष्पक्ष आणि जबाबदार शिक्षण प्रणालीची मागणी करत होते. त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी, सुरक्षा दलांनी प्राणघातक शस्त्रे आणि अश्रुधूरासह अंदाधुंद बळाचा वापर करून त्यांच्यावर हल्ला केला.”
अमित शाह यांना लिहिलेल्या पत्रात राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, पोलीस आणि सुरक्षा दलांच्या लाठीचार्जमुळे शेकडो विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. महिला विद्यार्थ्यांना पोलीस कर्मचाऱ्यांकडून मारहाण करण्यात आली, ज्यात त्यांच्या गुप्तांगांना जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात आले.
छात्रों को मारने का आदेश किसने दिया? pic.twitter.com/NDwfka1UqO
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 26, 2026
राहुल गांधी म्हणाले की, “प्राणघातक पेलेट गनचा वापर ही सर्वात धक्कादायक घटना होती. प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियावरील वृत्तांनुसार, एका पत्रकारासह अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. ”
त्यांनी पुढे सांगितले की, “त्यांची १९ वर्षीय विद्यार्थी साहिल लोचाब याच्याशी भेट झाली, जो सध्या तीव्र वेदनेत असून पेलेट गनच्या गोळीमुळे त्याच्या एका डोळ्याची दृष्टी जाण्याची शक्यता आहे.”
अमित शाह यांना उद्देशून राहुल गांधी म्हणाले की, “दिल्लीत तैनात असलेले सुरक्षा दल अंतिमतः तुम्हालाच जबाबदार आहे, म्हणून मी तुम्हाला विचारतो, गृहमंत्री म्हणून, तुम्ही विद्यार्थ्यांविरुद्ध पेलेट गनसह प्राणघातक बळाचा वापर करण्यास परवानगी दिली होती का? नसेल तर, कोणी परवानगी दिली होती?”
राहुल गांधी यांनी ‘पार्लमेंट चलो’ मोर्चादरम्यान झालेल्या हिंसाचारासंदर्भात अमित शाह यांना अनेक प्रश्न विचारले. त्यांनी विचारले की, साध्या वेशात विद्यार्थ्यांना काठ्यांनी मारहाण करणारे लोक पोलीस होते की स्वयंसेवक? त्यांच्या तैनातीला कोणी परवानगी दिली होती?





