Delhi Assembly Election 2025: दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशींवर आचारसंहिता भंगाचा आरोप

नवी दिल्ली –भाजपने दिल्लीच्या मुख्यमंत्री आणि आपच्या नेत्या आतिशी यांच्यावर निवडणूक आचारसंहिता भंगाचा आरोप केला. तसेच, नैतिकतेचा भाग म्हणून त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, अशी मागणीही केली.
दिल्लीतील कालकाजी मतदारसंघातून आतिशी निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याकडून प्रचारासाठी सरकारी वाहनाचा वापर सुरू आहे. त्यांच्या प्रचाराची सामग्री सरकारी वाहनातून नेली जाते. ती बाब आचारसंहितेचा भंग करणारी आहे. आपचे कार्यकर्तेही सरकारी वाहनांचा वापर करत आहेत, असा आरोप भाजपचे खासदार रामवीरसिंह बिधुरी यांनी पत्रकार परिषदेत केला. आचारसंहिता भंगाबद्दल नैतिकतेच्या आधारे आतिशी यांनी उमेदवारी मागे घ्यावी.
एवढेच नव्हे तर, मुख्यमंत्रिपदाचाही राजीनामा द्यावा, अशा मागण्याही त्यांनी केल्या. भाजपने आतिशी यांच्या विरोधात ज्येष्ठ नेते रमेश बिधुरी यांना उमेदवारी दिली आहे. विधानसभा निवडणुकीमुळे दिल्लीतील राजकीय वातावरण ऐन थंडीत चांगलेच तापले आहे. त्यातून प्रतिस्पर्धी पक्षांच्या नेत्यांकडून परस्परांवर आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडत आहेत. दिल्लीत ५ फेब्रुवारीला मतदान, तर मतमोजणी ८ फेब्रुवारीला होईल.





