Delhi Bomb Blast | दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या भीषण बॉम्बस्फोटात 12 जणांचा बळी गेला. तर 25 हून अधिक लोक जखमी आहेत झाले आहेत. एका कारमध्ये असलेल्या स्फोटकांच्या साहाय्याने हा आत्मघाती स्फोट घडवून आणण्यात आला. हा स्फोट म्हणजे दहशतवादी हल्ला असल्याचे आता स्पष्ट करण्यात आले आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उच्चस्तरीय बैठकीनंतर याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे म्हणजेच NIA कडे सोपवला आहे. हा तपास मराठमोळे आयपीएस अधिकारी विजय साखरे यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. आयपीएस अधिकारी विजय साखरे या पथकाचे प्रमुख आहेत. ते NIA चे अतिरिक्त महासंचालक (ADG) आहेत. NIA ने यासाठी विशेष १० अधिकाऱ्यांचे पथक तयार केले आहे. यात IG, दोन DIG आणि तीन SP तसेच उर्वरित DSP स्तरावरील अधिकारी समाविष्ट आहेत. ते नियमितपणे NIA प्रमुखांना दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणाच्या तपासाचे स्टेटस रिपोर्ट देतील. दरम्यान, तपासासाठी NIA चे पथक दिल्ली पोलीस, जम्मू-काश्मीर पोलीस आणि हरियाणा पोलीस यांच्याकडून जैश-ए-मोहम्मदच्या या दहशतवादी मॉड्यूलशी संबंधित सर्व केस डायरी ताब्यात घेईल. उत्तर प्रदेश ATS कडूनही सहकार्य घेतले जाईल. दहशतवादी डॉक्टरांच्या या मॉड्यूलशी संबंधित सर्व पैलूंची तपास केली जाईल. फरीदाबाद दहशतवादी मॉड्यूलच्या निधीपुरवठा आणि ऑपरेशनच्या मास्टरमाइंडला उघड करण्याचे आव्हान NIA समोर असणार आहे. Delhi Bomb Blast | केरळ कॅडरचे IPS अधिकारी मूळचे नागपूरचे असलेले विजय साखरे हे १९९६ बॅचचे केरळ कॅडरचे अधिकारी आहेत. ते NIA मध्ये इन्स्पेक्टर जनरल पदावरही कार्यरत होते. त्यांनी १९८९ ते १९९२ या कालावधीत नागपूरमधील व्हीएनआयटीमधून (विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) बीई पूर्ण केले. त्यानंतर साखरे यांनी १९९२ ते १९९३ दरम्यान आयआयटी दिल्लीतून शिक्षण घेतले. त्यांनी अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी मिळवली. साखरे हे २००० ते २००४ या कालावधीत केरळमध्ये पोलीस अधीक्षक बनले. त्यानंतर त्यांची राष्ट्रीय तपास यंत्रणेचे आयजी म्हणून नियुक्ती झाली. सप्टेंबर २०२५ मध्ये त्यांना NIA मध्ये ADG पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. आतापर्यंत 3 डॉक्टरांना अटक दरम्यान, दहशतवादी मॉड्यूलमध्ये आतापर्यंत डॉ. मुजम्मिल शकील, डॉ. आदिल अहमद, डॉ. शाहीना यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. हे सर्व डॉक्टर फरीदाबादच्या अल फलाह विद्यापीठाशी संबंधित आहेत. तर संशयित हल्लेखोर डॉ. उमर मोहम्मद हाच त्या कारमध्ये होता, ज्यामध्ये लाल किल्ल्याजवळ स्फोट झाला. एनआयएचे महासंचालक सदानंद दाते आहेत. ते महाराष्ट्रातून दिल्लीला गेले आहेत. बुधवारी दाते यांची केंद्र सरकारने दिल्ली बॉम्बस्फोट चौकशी पथकाचे प्रमुख म्हणून नियुक्ती केली. दिल्ली बॉम्बस्फोटांच्या तपासातील प्रगतीबाबत एनआयएचे महासंचालक सदानंद दाते आणि गुप्तचर विभागाचे प्रमुख यांच्यात बुधवारी बैठक झाली. त्यानुसार आता दिल्ली स्फोटाचे धागेदोरे असल्याच्या संशयावरून दिल्लीजवळील फरिदाबादच्या अल-फलाह विद्यापीठाचीही कसून तपासणी सुरू आहे. लाल किल्ला स्फोटात फरीदाबाद, सहारनपूर, अनंतनाग ते पुलवामा पर्यंतचे कनेक्शन समोर आले आहे. Delhi Bomb Blast | हेही वाचा: शरद पवारांसाठी गुड न्यूज! निवडणूक आयोगाने घेतला मोठा निर्णय; ‘तो’ संभ्रम कायमचा मिटवला