Dehuroad Police : देहूरोड पोलिसांची धडक कारवाई! घरफोडीचा अवघ्या २४ तासांत छडा; अट्टल चोरटा गजाआड
Dehuroad Police : निगडी, भोसरी, चिखली आणि वाकड पोलिसांना हुलकावणी देणारा चोरटा जेरबंद; आरोपीला वडगाव न्यायालयात केले हजर.

Dehuroad Police – मुख्य बाजार परिसरातील घरफोडीचा अवघ्या २४ तासांत छडा लावत एका अट्टल घरफोड्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून चोरीस गेलेले सुमारे ५२ ग्रॅम सोन्याचे व २२५० ग्रॅम चांदीचे दागिने जप्त करण्यात आले असून चोरीतील शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव विक्रमसिंग विठ्ठलसिंग ठाकूर (वय ३७, रा. देहूगाव) असे आहे. याप्रकरणी मुकेश नारायण गुप्ता (वय ५५) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश गुप्ता यांनी मंगळवारी (दि. २) घराला कुलूप लावून बाहेर गेल्यानंतर अज्ञात चोरट्याने कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला आणि सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल कुबडे यांच्या सूचनेनुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अक्षय जाधव यांच्यासह दोन तपास पथके तयार करण्यात आली. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी करण्यात आली. त्यातून घटनास्थळी दिसून आलेल्या केशरी रंगाच्या रिक्षेचा पाठलाग करण्यात आला.
तपासाच्या आधारे देहू येथील वैकुंठगमन स्थान परिसरात सापळा रचून विक्रमसिंग ठाकूर याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या रिक्षेची झडती घेतली असता घरफोडीसाठी वापरण्यात येणारी लोखंडी कटावणी आढळून आली. चौकशीदरम्यान त्याने सदर घरफोडीची कबुली दिली. त्याच्याविरुद्ध निगडी, भोसरी, चिखली आणि वाकड पोलीस ठाण्यांत ३५ हून अधिक घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपीकडून सर्व सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले असून अधिक तपास सुरू आहे. पुढील तपासासाठी आरोपीला वडगाव न्यायालयात हजर करण्यात आले आहे.





