Pune Crime News : स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपीवर दोषारोप निश्चिती; ८७ साक्षीदारांची यादी न्यायालयात सादर
Pune Crime News : पुण्यातील अत्यंत गाजलेल्या स्वारगेट शिवशाही बस अत्याचार प्रकरणातील आरोपीवर विशेष सत्र न्यायालयात दोषारोप निश्चित करण्यात आले आहेत.

Pune Crime News : स्वारगेट बस स्थानकातील बसमध्ये तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणातील आरोपीवर दोषारोप निश्चिती करण्यात आली आहे. विशेष सरकारी वकिलांकडून सोमवारी (ता. १) ८७ साक्षीदारांसह आरोपीच्या विरोधातील पुराव्यांची यादी न्यायालयात सादर करण्यात आली आहे. (Pune Crime News)
बलात्कारासह विविध कलमांचा समावेश आरोप निश्चितीत करण्यात आला आहे. स्वारगेट बस स्थानकामध्ये शिवशाही बसमध्ये आरोपी दत्तात्रेय रामदास गाडे (वय ३७, रा. गुनाट, शिरूर) याने तरुणीवर बलात्कार केल्याची घटना २५ फेब्रुवारी २०२५ ला घडली होती. त्यानंतर गाडे घटनास्थळावरून फरार झाला होता. (Pune Crime News)
तो आपल्या गावातील शेतात लपून बसला होता. पुणे पोलिसांनी त्याला अटक करून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्याला १२ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्याची रवानगी येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. (Pune Crime News)
गुन्हा घडल्यानंतर ५२ दिवसांत पोलिसांनी ८९२ पानी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. तपासादरम्यान ८२ साक्षीदारांची चौकशी करण्यात आली. एकूण १२ पंचनामे करण्यात आले असून, त्यात गुगल सर्च हिस्टरी, तुलनात्मक ध्वनी तीव्रता पडताळणी, ओळख परेड, सीसीटीव्ही फुटेज आणि निवेदन या पाच महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे. (Pune Crime News)
या पंचनाम्यांमधून आरोपी गुन्ह्याच्या वेळी घटनास्थळी उपस्थित असल्याचे थेट तसेच परिस्थितीजन्य पुरावे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहेत. या खटल्यात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अजय मिसर काम पाहत असून, मुलीच्यावतीने ॲड. श्रीया आवले बाजू मांडत आहेत. या खटल्याची पुढील सुनावणी १५ जूनला होणार आहे. (Pune Crime News)





