Dehugaon Power Outage : संतभूमीत विजेचा खेळखंडोबा! देहूगावात तासन्तास अंधार; महावितरणच्या कारभारावर नागरिक संतप्त
Dehugaon Power Outage : वाढत्या नागरीकरणामुळे विजेची मागणी झपाट्याने वाढली; मात्र जुन्या केबल्स आणि ट्रिपिंगमुळे पावसाळा-उन्हाळ्यात जनजीवन विस्कळीत.

Dehugaon Power Outage – श्री क्षेत्र देहू शहर आणि परिसरातील वाढत्या वीज समस्यांमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होत असून वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, कमी दाब आणि तांत्रिक बिघाडांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या नागरीकरणाच्या तुलनेत वीज वितरण यंत्रणा सक्षम करण्यात आलेली नसल्याने भविष्यात गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
देहूगाव हे संत तुकाराम महाराजांचे पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून संपूर्ण राज्यात ओळखले जाते. वर्षभर येथे भाविकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. त्याचबरोबर गेल्या काही वर्षांत परिसरात मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प, व्यावसायिक संकुले आणि औद्योगिक विकास झाला आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे वीजेची मागणी झपाट्याने वाढली असली तरी महावितरणची यंत्रणा मात्र अपुरी पडत असल्याचे चित्र आहे.
परिसरात वारंवार होणाऱ्या वीज खंडित होण्याच्या घटनांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेक भागांत कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने घरगुती उपकरणे बंद पडण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. उन्हाळ्यात विजेची मागणी वाढल्यानंतर परिस्थिती अधिक गंभीर बनत असून नागरिकांना तासन्तास अंधारात राहावे लागत आहे. पावसाळ्यात तर केबल बिघाड आणि ट्रिपिंगच्या घटना सातत्याने घडत असल्याने वीजपुरवठा पूर्णपणे विस्कळीत होत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
या वाढत्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाय म्हणून देहूगाव येथील हरीत लँडमार्क परिसरात नवीन ३३/२२ केव्ही क्षमतेचे उपकेंद्र उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देहूशहर अध्यक्ष विवेक काळोखे यांनी मावळचे आमदार सुनील शेळके यांच्याकडे निवेदन देत देहूगाव परिसरातील वीज समस्यांचे तातडीने निराकरण करण्याची मागणी केली आहे.
सध्या देहूगाव आणि चिंचोली या २२ केव्ही वाहिन्यांवर मोठ्या प्रमाणात ताण निर्माण झाला आहे. २२०/२२ केव्ही टेल्को अति उच्चदाब उपकेंद्रातून येणाऱ्या २२ केव्ही पीएसपी आणि २२ केव्ही देवी इंद्रायणी इनकमर वाहिन्यांवर अनुक्रमे २८० अँपिअर आणि ३७५ अँपिअर इतका भार पडत आहे. तसेच अनेक केबल्स जुन्या झाल्याने वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.






