Dehu News: देहू नगरपंचायतीच्या ३ नगरसेवकांना दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडून अपात्रतेचा अर्ज फेटाळला
Dehu News: विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप अमान्य; पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी फेटाळली विरोधी गटाची याचिका.

Dehu News – देहू नगरपंचायतीतील तीन नगरसेवकांना अपात्र ठरविण्याची मागणी करणारा अर्ज पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी फेटाळला आहे. याबाबतचे आदेश जिल्हा सहआयुक्त (नगरपालिका प्रशासन) मच्छिंद्र घोलप यांनी पत्राद्वारे कळविले आहेत. विधानसभा निवडणुकीदरम्यान पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप करत योगेश हनुमंत काळोखे, गटनेते योगेश बाळासाहेब परंडवाल आणि मयूर दत्तात्रय शिवशरण यांनी नगरसेवक प्रवीण रामदास काळोखे,
मीना राहुल कुऱ्हाडे आणि सपना जयेश मोरे यांच्यासह देहू नगरपंचायतीविरोधात कारवाईची मागणी केली होती. याबाबत सुमारे दीड वर्षांपूर्वी पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे अपात्रतेचा अर्ज दाखल केला होता. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी २४ जुलै २०२६ रोजी दिलेल्या आदेशात अपात्रतेचा दावा अमान्य करत अर्ज फेटाळून लावला.
तसेच या प्रकरणात खर्चाबाबत कोणताही स्वतंत्र आदेश देण्यात आलेला नाही. या निर्णयामुळे संबंधित तीन नगरसेवकांना दिलासा मिळाला असून, आगामी चार महिन्यांत देहू नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होण्याची शक्यता असल्याने स्थानिक राजकारणात नव्या घडामोडींना वेग येण्याची चर्चा सुरू झाली आहे. निर्णयानंतर विविध राजकीय पक्षांकडून पुढील राजकीय रणनीती आखण्यास सुरुवात झाल्याचे बोलले जात आहे.





