Uddhav Thackeray : नाशिकमध्ये फुटीच्या चर्चांनी खळबळ! उद्धव ठाकरेंनी त्या नगरसेवकांना धाडला आदेश; घडामोडींना वेग
Uddhav Thackeray : या बैठकीत उद्धव ठाकरे प्रत्येक नगरसेवकाशी स्वतंत्रपणे संवाद साधणार असून, त्यांच्या पक्षनिष्ठेची खात्री करून घेणार आहेत.

Uddhav Thackeray : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता नाशिक महापालिकेतील काही नगरसेवकांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चांनी ठाकरे गटाची चिंता वाढवली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः मैदानात उतरून ‘डॅमेज कंट्रोल’ची सूत्रे हाती घेतली आहेत. नाशिकमधील सर्व १५ नगरसेवकांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांना बुधवार (१५ जुलै) रोजी दुपारी दोन वाजता मुंबईतील ‘मातोश्री’वर उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या बैठकीत उद्धव ठाकरे प्रत्येक नगरसेवकाशी स्वतंत्रपणे संवाद साधणार असून, त्यांच्या पक्षनिष्ठेची खात्री करून घेणार आहेत. याशिवाय स्थानिक पदाधिकाऱ्यांशीही चर्चा करत नाशिकमधील पक्षसंघटना मजबूत ठेवण्यासाठी आणि संभाव्य फूट रोखण्यासाठी रणनीती आखली जाणार आहे.
‘ऑपरेशन टायगर’ मोहिमेअंतर्गत ठाकरे गटाचे नऊपैकी सहा खासदार शिंदे गटात दाखल झाले आहेत. त्यानंतर आता नाशिक महापालिकेतील १५ पैकी १२ नगरसेवकही शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांनी राजकीय वातावरण तापले आहे. जरी १२ नगरसेवकांनी आपण पक्षासोबत असल्याचा दावा केला असला, तरी पक्ष नेतृत्वाने कोणताही धोका न पत्करता तातडीने ‘डॅमेज कंट्रोल’ सुरू केले आहे.
हेही वाचा : Pune News : सेवाभावाची परंपरा कायम! युनिक मेडिकल फाउंडेशनकडून वारकऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय शिबिर
नगरसेवकांना पक्षांतरासाठी आमिष दाखवले जात असल्याचा गंभीर आरोप केला जात आहे. १२ नगरसेवक शिंदे गटात आणल्यास उपमहापौरपद आणि विकासकामांसाठी पाच कोटी रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन दिले जात असल्याची चर्चा नाशिकच्या स्थानिक राजकीय वर्तुळात आहे. ही फक्त चर्चा आहे असे म्हणत, उद्धव ठाकरेंच्या स्थानिक नेत्यांनी यापूर्वीच हा दावा फेटाळून लावला आहे.
राजकीय घडामोडींना वेग
बुधवारी ‘मातोश्री’वर होणाऱ्या बैठकीत उद्धव ठाकरे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांकडून थेट अभिप्राय जाणून घेणार आहेत. नाशिकमधील राजकीय परिस्थिती, पक्षातील वातावरण आणि एकनिष्ठेबाबत सविस्तर चर्चा होणार असून, या बैठकीकडे संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या बैठकीनंतर नाशिकमधील फुटीच्या चर्चांना पूर्णविराम मिळतो की नव्या राजकीय घडामोडींना वेग येतो, याकडेच आता अनेकांचे लक्ष असणार आहे.
संजय राऊतांचा नाशिक दौरा रद्द
नाशिक महापालिकेतील नगरसेवकांच्या संभाव्य फुटीच्या चर्चांमुळे ठाकरे गटात खळबळ उडाली आहे. राजकीय समीकरण बदलणार असल्याची चर्चा आहे. याच दरम्यान संजय राऊत नाशिक दाैऱ्यावर होते. पण त्यांचाही नाशिक दाैरा रद्द करून बैठक मातोश्रीवर घेण्याचा निर्णय घेण्यात आला.





