Dehu News: देहू-देहूरोड पालखी मार्गावर ‘खड्ड्यांचे साम्राज्य’; ज्येष्ठ नागरिकांकडून खड्ड्यांचे पूजन करत आंदोलन
Dehu News: काही महिन्यांपूर्वीच केला होता २५ लाखांचा खर्च; निकृष्ट दर्जामुळे सार्वजनिक निधी वाया गेल्याचा देहूतील नागरिकांचा आरोप.

Dehu News- देहू-देहूरोड पालखी मार्गावरील झेंडेमळा ते देहू फाटा दरम्यान रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला असून, रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने काही महिन्यांपूर्वी या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी सुमारे २५ लाख रुपये खर्च करण्यात आले होते. मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्ता पुन्हा खड्डेमय झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
त्यामुळे सार्वजनिक निधी खर्च करूनही रस्त्याची परिस्थिती जैसे थे राहिल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी चिंचोलीतील ज्येष्ठ नागरिकांनी रस्त्यावरील खड्ड्यांचे पूजन करून आंदोलन केले. खड्ड्यांवर केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता दर्जेदार आणि कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
रस्त्यावरून दुचाकी, चारचाकी तसेच अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते. खड्ड्यांमुळे वाहनचालकांना वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. या आंदोलनात बाळासाहेब जाधव, तुकाराम जाधव, संजय सावंत, श्रीरंग सावंत, रमेश जाधव, संजय पिंजण, जयवंत पानसरे, सहादू पानसरे, सचिन पानसरे आदींसह परिसरातील नागरिक सहभागी झाले होते.
देहू कमान-सी.ओ.डी. रस्ताही खड्डेमय
देहू कमान ते सी.ओ.डी. डेपो प्रवेशद्वारादरम्यानच्या रस्त्यावरही मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. हा संत तुकाराम महाराज पालखी मार्ग असल्याने या रस्त्यावर नागरिक, कामगार तसेच लष्करी जवानांची मोठी वर्दळ असते. रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करावे. गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारावेत. आवश्यक ठिकाणी सूचना फलक लावावेत. तसेच रस्त्यावरील विद्युत पथदिवे अखंडित सुरू ठेवावेत, अशी मागणी सी.ओ.डी. वर्क्स कमिटी आणि कमिटीचे सेक्रेटरी जगदीश दुमडे यांनी केली आहे.




