Dehu Nagar Panchayat: राष्ट्रवादीचा एकहाती गड ढासळणार? भाजपने देहूत टाकला मोठा डाव; राजकीय वर्तुळात खळबळ
Dehu Nagar Panchayat: मुदत संपण्यास चार महिने शिल्लक असतानाच देहू नगरपंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल; भाजपकडून आक्रमक बांधणी आणि सत्ताधाऱ्यांची कोंडी.

Dehu Nagar Panchayat – देहू नगरपंचायतीची पंचवार्षिक मुदत चार महिन्यांनी संपणार आहे. त्यामुळे निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. देहू नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. त्यामुळे इच्छुक महिला कार्यकर्त्यांमध्ये स्पर्धा वाढली आहे. राजकीय पक्षांनीही निवडणुकीच्या तयारीला वेग दिला आहे. विशेषतः भाजपने आक्रमक भूमिका घेत संघटनात्मक बांधणी सुरू केली आहे.
त्यामुळे आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसपुढे आव्हान उभे राहण्याची चर्चा देहूत सुरू आहे. देहू ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतर २०२१ मध्ये पहिली निवडणूक झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने १७ पैकी १४ जागा जिंकत एकहाती सत्ता मिळविली होती. यावेळी भाजपचा एक आणि अपक्षाचे दोन सदस्य विजयी झाले होते. मात्र नंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने नगरपंचायतीत विरोधकच उरला नाही.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने नवीन कार्यालय सुरू करून संघटनात्मक तयारीला सुरुवात केली आहे. माजी मंत्री बाळा भेगडे यांनी सक्रिय होत आगामी निवडणुकीत भाजपचे दहापेक्षा अधिक सदस्य विजयी होतील, असा दावा केला आहे. नगरपंचायतीतील रखडलेली विकासकामे, देहू-देहूरोड पालखी मार्गाचे रुंदीकरण, देहू-आळंदी रस्ता, वीज, पाणी, रस्ते, सांडपाणी आणि वाहतूक कोंडी यांबाबत भाजपने प्रश्न उपस्थित केले आहेत.
आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक काम करीत आहेत. साडेचार वर्षांत कोट्यवधी रुपयांची विकासकामे झाली आहेत. मात्र ही विकासकामे जनतेपर्यंत पोहोचविण्याचे मोठे आव्हान सत्ताधाऱ्यांसमोर आहे. देहू-आळंदी रस्त्याचे रखडलेले रुंदीकरण, वीजपुरवठ्याच्या समस्या, सांडपाणी प्रकल्पाची दुरवस्था आणि वाढते नागरीकरण याबाबत देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत.




