Vadgaon Maval : तरुणांवर संस्कारांसोबत संवादही गरजेचा; माजी मंत्री बाळा भेगडे यांचे प्रतिपादन
Vadgaon Maval : 'पालकांनी मुलांच्या हालचालींकडे लक्ष देतानाच त्यांच्या अपेक्षा आणि समस्या समजून घेणे आवश्यक'

वडगाव मावळ : – आजच्या तरुण पिढीला चुकीच्या मार्गापासून आणि व्यसनाधीनतेपासून दूर ठेवण्यासाठी पालकांनी मुलांवर केवळ संस्कार न करता त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री बाळा भेगडे यांनी केले. नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
कमी वयात सहज उपलब्ध होणारा पैसा, वाहने आणि रात्री उशिरापर्यंत घराबाहेर राहण्याची वाढती प्रवृत्ती यामुळे तरुणाई भरकटण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे पालकांनी मुलांच्या हालचालींकडे लक्ष देतानाच त्यांच्या अपेक्षा आणि समस्या समजून घेणे आवश्यक आहे, असे भेगडे यांनी सांगितले.
मावळ तालुका अमली पदार्थमुक्त करण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि पत्रकारांनी एकत्रितपणे जनजागृती करणे गरजेचे आहे. अमली पदार्थ, एमडी आणि ड्रग्जच्या वाढत्या धोक्यापासून तरुणांना दूर ठेवण्यासाठी गावागावांत प्रबोधनाचे कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Pune District : महिन्यातून एक दिवस संपूर्ण तालुक्यासाठी; खासदार कोल्हे
नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक संस्थेच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे १२० कंपन्यांमध्ये तीन हजार विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्याचे भेगडे यांनी सांगितले. संस्थेची सुमारे १७ हजार चौरस मीटरची लायब्ररी असून ती पुणे जिल्ह्यातील मोठ्या ग्रंथालयांपैकी एक असल्याचे त्यांनी नमूद केले.
नवीन समर्थ विद्यालयाच्या वास्तूचे काम सुरू असून मावळभूषण माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण लवकरच करण्यात येणार आहे. संस्थेची प्रवेश प्रक्रिया आगामी काळात पेपरलेस आणि ऑनलाइन करण्याचे नियोजन असल्याचेही भेगडे यांनी सांगितले. यावेळी संस्थेचे मार्गदर्शक सोनवणे, मावळ पंचायत समितीचे माजी उपसभापती शांताराम कदम, इंदोरी-तळेगाव मंडलाचे अध्यक्ष विनायक भेगडे उपस्थित होते.
Satara: कार्यकर्त्यांना हात लावाल तर जशास तसे उत्तर देऊ… ना. शिवेंद्रसिंहराजे





