देहूगाव, (वार्ताहर) – देहू नगरपंचायतीचे थकीत मिळकत कर वसूल करण्यास आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या शासकीय कामात अटकाव करीत शिवीगाळ, दमदाटी करीत अंगावर धावून गेल्या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आले आहे. ही घटना बुधवारी दुपारी एकच्या सुमारास माळीनगर येथे घडली.
सागर धोंडीबा गायकवाड (रा. माळीनगर, देहूगाव ) यांच्या विरुद्ध देहू नगरपंचायतीचे कर संकलन प्रमुख ज्ञानेश्वर शिंदे यांनी फिर्याद नोंदविली आहे. देहू नगरपंचायतीचे थकीत मिळकत कर वसूल करण्यासाठी कर विभाग प्रमुख ज्ञानेश्वर शिंदे, पाणी पुरवठा विभाग प्रमुख धनंजय नायकवडे, कर्मचारी.
आशा मोरे, अजय वाल्मिकी, दत्ता शिंदे, आसिफ शेख, प्रतीक चव्हाण, किरण झगडे, सुरेश खंडागळे आदींचे पथकाने माळीनगर येथील सागर गायकवाड यांच्याकडे थकित असलेला मिळकत कर भरण्यास सांगितले. कर मागितल्याचा राग मनात धरून कर अधिकारी व उपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या शासकीय कामात अटकाव करीत शिवीगाळ, दमदाटी करीत अंगावर धावून आले, असे तक्रारीत म्हटले आहे.