मंगलदास बांदलांच्या बंगल्यांची झाडाझडती

शिक्रापूर -पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पैलवान मंगलदास बांदल यांच्यासह त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्या रेखा मंगलदास बांदल व त्यांच्या साथीदारांवर फसवणूक प्रकरणी गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलिसांनी मंगलदास बांदल यांना अटक केली.
त्यानंतर न्यायालयाने बांदल यांना एक जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शिक्रापूर पोलिसांसह आर्थिक गुन्हे शाखेच्या तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून बांदल यांच्या बंगल्यांची झाडाझडती करण्यात आली आहे.
शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे मंगलदास बांदल यांच्यासह त्यांच्या जिल्हा परिषद सदस्या रेखा मंगलदास बांदल, गोविंद शंकर झगडे, मोहन जयसिंग चिखले (सर्व रा. शिक्रापूर ता. शिरूर) यांच्यासह एकावर गुन्हा दाखल आहे.
शिक्रापूर येथील दत्तात्रय रावसाहेब मांढरे यांच्या जागेतील गाळ्यांचे बोगस गहाणखत बनवून शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेचे एक कोटी पंचवीस लाख रुपये कर्ज काढून बॅंकेचे कर्ज न भरता दोन कोटी पन्नास लाख रुपये थकवून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
यावेळी शिक्रापूर पोलिसांनी पैलवान मंगलदास बांदल यांना अटक केली. सध्या मंगलदास बांदल यांची पोलीस कसून चौकशी करीत आहेत. पोलिसांनी कोणाची फसवणूक झाली असल्यास तक्रार देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे,
परंतु अद्याप कोणतीही तक्रार पुढे आलेली नाही, परंतु शिक्रापूर पोलिसांनी आर्थिक गुन्हे शाखेच्या तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकारी व पोलीस तसेच कर्मचाऱ्यांची मदत घेत बांदल यांच्या शिक्रापूर व हडपसर येथील बंगल्यांची तसेच
त्यांच्या शिक्रापूर येथील हवेली आणि येकाय कंपनीची झाडाझडती केली आहे, मात्र यावेळी केलेल्या झाडाझडतीमध्ये पोलिसांना काही जमिनींचे सातबारा उतारे मिळून आले आहेत.
शिक्रापूर पोलिसांनी सुरू केलेल्या सखोल तपासाबाबत परिसरातून प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. यापूर्वी शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अनेक गंभीर गुन्हे घडलेले असताना पोलिसांनी त्या गुन्ह्याच्या तपासासाठी अशा पद्धतीची शिताफी का दाखवली नाही, असा देखील सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.





