Bihar politics : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सक्रिय राजकारणातून राज्यसभेवर जाण्याचा घेतलेला निर्णय हा बिहारच्या राजकारणात एका मोठ्या वैचारिक सत्तांतराचा संकेत आहे, असे मत भाकप (माले) लिबरेशनचे सरचिटणीस दीपंकर भट्टाचार्य यांनी मांडले. रविवारी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या घडामोडीला बिहारच्या जनतेचा विश्वासघात आणि भाजपचा जेडीयूला गिळंकृत करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. भट्टाचार्य यांच्या मते, नितीश कुमार यांचे मुख्यमंत्रिपद सोडून दिल्लीला जाणे ही केवळ सत्तेची अदलाबदल नसून, बिहारसह उत्तर भारताच्या राजकीय चर्चेची दिशा बदलण्याचे षडयंत्र आहे. नितीश कुमारांच्या नावावर मते मागणाऱ्या एनडीएने निवडणुकीनंतर काही महिन्यांतच त्यांना अशा प्रकारे बाजूला करणे, हे लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत अनादरकारक आहे. ज्या नेत्याकडे कधीकाळी पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून पाहिले जात होते, त्यांना आता राज्यसभेचे स्वप्न पडत आहे, हा तर्क कोणालाही न पटणारा आणि हास्यास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. गेल्या दोन दशकांपासून बिहारच्या राजकारणाची धुरा सांभाळणाऱ्या नितीश कुमारांना भाजपने अत्यंत अपमानित करून सत्तेतून बाहेरचा रस्ता दाखवला आहे, असे भट्टाचार्य म्हणाले. जेडीयू आता पूर्णपणे भाजपच्या छायेखाली गेली असून, नितीश कुमारांचा समाजवादाचा आणि जातीयवादाशी तडजोड न करण्याचा विचार आता संपुष्टात आला आहे. ही परिस्थिती जेडीयूच्या आमदारांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता निर्माण करणारी असून, भविष्यात राज्यात मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळू शकतो.असे भट्टाचार्य म्हणाले. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर बोट ठेवताना भट्टाचार्य यांनी आरोप केला की, बिहारमध्ये आता ‘बुलडोझर राज’ सुरू झाले असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. बेरोजगारी आणि सामाजिक न्यायाच्या मुद्द्यांवरून जनतेमध्ये मोठा संताप असून, भाजप जर आपला मुख्यमंत्री लादण्याचा प्रयत्न करत असेल, तर हा बदल सोपा नसेल. बिहारची जनता या राजकीय बंडाला आणि वैचारिक गुलामगिरीला चोख प्रत्युत्तर देईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.