दीपक हुडाच्या आयपीएलमधील 3 सर्वोत्तम खेळ्या

पुणे : 26 वर्षीय अष्टपैलू खेळाडू दीपक हुडा, सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये राजस्थानचे प्रतिनिधित्व करतो, त्याचा वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय एकदिवसीय संघात समावेश करण्यात आला आहे. ही मालिका 6 फेब्रुवारीपासून अहमदाबाद येथे सुरू होत आहे.
2022 च्या आयपीएल लिलावाच्या पार्शभूमीवर भारतीय संघात दीपकची झालेली निवड प्रतिभावान अष्टपैलू खेळाडूसाठी सकारात्मक चिन्ह आहे. या पार्श्वभूमीवर, लेखातून दीपक हुडाने 2015 मध्ये पदार्पण केल्यापासून त्याच्या आयपीएलमधील तीन सर्वोत्तम खेळ्यांवर प्रकाश टाकणार आहोत.
1) 28 चेंडूत 64 धावा (पंजाब विरुद्ध राजस्थान वानखेडे स्टेडियम, 2021)
आयपीएलच्या 14 व्या हंगामातील पहिल्या सामन्यात पंजाब किंग्जकडून खेळताना दीपक हुडाने दमदार सुरुवात केली. राजस्थान रॉयल्स विरुद्ध खेळताना, दीपक हुडाने 228.57 च्या स्ट्राइक-रेटने फक्त 28 चेंडूत 64 धावा करत आपले तिसरे आयपीएल अर्धशतक केले. हुडाच्या खेळीत चार चौकार आणि सहा षटकारांचा समावेश होता त्या सामन्यात केएल राहुल पंजाबकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला असला तरी, दुसर्या टोकाला हुडाने कर्णधाराला चांगली साथ दिली आणि दोघांनी तिसर्या विकेटसाठी 105 धावांची भागीदारी केली. यामुळे पंजाब किंग्सला 20 षटकात 6 बाद 221 अशा आव्हानात्म धावा करता आल्या. आणि पंजाबने रंगतदार सामन्यात अवघ्या चार धावांनी विजय मिळवला.
2)30 चेंडूत 62* धावा (शेख झायेद स्टेडियम, अबू धाबी, पंजाब विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, 2020)
राजस्थान रॉयल्स बरोबरच्या दोन वर्षांच्या कारकिर्दीनंतर, दीपक हुडाला 2016 च्या लिलावात सनरायझर्स हैदराबादने तब्बल 4.2 कोटींना विकत घेतले. मात्र 2016 ते 2020 या कालावधीत हुडाला हैदराबादसाठी समाधानकार कामगिरी करता आली नाही.
2020 च्या आयपीएल लिलावात दीपकला पंजाब किंग्जने 50 लाखांमध्ये विकत घेतले. अबुधाबी येथे चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या साखळी फेरीतील एका सामन्यात, 26 वर्षीय खेळाडूने पुन्हा एकदा आपल्या फटकेबाजीने धुरळा उडवून दिला.
सलामीवीर केएल राहुल आणि मयंक अग्रवाल यांच्या फटाकेबाजीमुळे पंजाबने अवघ्या 5.2 षटकांत 48-0 अशी चांगली सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर पंजाबची 12 षटकांत 4 बाद 72 धावा अशी अवस्था झाली. अशा परिस्थितीत क्रीजवर आलेल्या हुडाने तेथून पंजाबच्या डावाची सुत्रे हाती घेतली आणि फक्त 30 चेंडूत नबाद 62 धावा केल्या. त्याच्या नाबाद खेळीत तीन चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता. हुडाच्या या खेळीमुळे पंजाबला 20 षटकांत 6 बाद 153 धावा उभारता आल्या.
असे असले तरी दुर्दैवाने हुडाचे प्रयत्न निष्फळ ठरले आणि चेन्नईने 9 फलंदाज राखून हा सामना एकहाती जिंकला.
3) 25 चेंडूत 54 धावा (राजस्थान विरुद्ध दिल्ली, फिरोझशाह कोटला स्टेडियम, दिल्ली, 2015)
अष्टपैलू दीपक हुडाने 2015 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. या हंगामातील दिल्ली विरुद्धच्या साखळी फेरीच्या सामन्यात रॉयल्सचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने नानेफेक जिंकत दिल्लीला प्रथम फलंदाजीस उतरवले. आपल्या दर्जेदार फलंदाजीच्या जोरावर दिल्लीने 20 षटकांत 3 बाद 184 धावा केल्या.
हंगामातील सलग दुसर्या विजयासाठी 185 धावांचा पाठलाग करताना, आयपीएलच्या पहिल्या विजेत्या रॉयल्सची अवस्था 4 बाद 78 अशी झाली होती. मात्र, आपला दुसरा आयपीएल सामना खेळत असलेल्या 19 वर्षीय दीपक हुडाने दिल्लीच्या गोलंदाजांना फोडून काढत मैदानात सर्वत्र फटाकेबाजी केली. हुडाने 216 च्या स्ट्राइक रेटने 25 चेंडूत तीन चौकार आणि चार षटकारांसह 54 धावांची खेळी केली.
दीपक हुडाने अखेरच्या चेंडूवर विजयी धावा घेत रॉयल्सला तीन फलंदाज राखून सामना जिंकून दिला. दीपकच्या या कामगिरीसाठी त्याला सामनावीरच्या पुरस्काराने गौरवण्यात आले होते.





